नगर जिल्हा रुग्णालयात अग्नी प्रतिबंधक उपायांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण 510 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 144 कोटी व आदिवासी उपाययोजना 46 कोटी असा एकूण 700 कोटी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी संबंधित यंत्रणांनी विविध कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामांवर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. दरम्यान, नगर जिल्हा रुग्णालयात अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वसाधारण योजनेकरिता जिल्ह्याचा 475 कोटी निधी होता. मात्र, यावर्षी वित्त मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी जादाचे 65 कोटी वितरित करून सर्वसाधारण योजनेकरिता 510 कोटींचा निधी मंजूर केला आहे. कोरोनासाठी यातील 30 टक्के निधी खर्च करावयाचा आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी. प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी शिर्डी संस्थानकडून 10 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र, अंदाजपत्रक जास्त असल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून 29 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कानिफनाथ गडावर रोप-वे होणार

जिल्ह्यात श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान, ब्राह्मणगाव (कोपरगाव), श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान, मनोहरपूर (अकोले) व सदगुरू हरिहर सत्संग लिंगतीर्थ ट्रस्ट, इसळक (नगर) या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट (मढी) व श्री क्षेत्र सावरगाव येथे रोप-वे उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी खर्च करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.