
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून (दि. 18) जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, राज्य सदस्य डॉ. निसार शेख, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, उपाध्यक्ष डॉ. सागर झावरे, डॉ. अमित करडे, डॉ. अशोक नरवडे, डॉ. गणेश बडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. मिश्रा, डॉ. केसरी, डॉ. सुनील साबळे, डॉ. श्वेता भालसिंग, डॉ. सुरेंद्र रच्चा उपस्थित होते.
तिसगाव येथे डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर शुक्रवारी (दि. 8) जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु आजतागायत गुन्हेगारांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पवार नावाच्या केडगावमधील आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर नगर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, अत्यावश्यक रुग्णसेवासुद्धा सोमवारपासून सुरक्षेअभावी बेमुदत बंद ठेवण्यात येईल. भयमुक्त वातावरणात काम करता येणे, हा सर्व डॉक्टर्सचा मूलभूत अधिकार डावलण्यात येत असेल, तर हे पाऊल उचलावेच लागेल, असा इशारा देण्यात
आला आहे.


























































