धोकादायक वर्गामध्ये विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, नगर झेडपीच्या शाळा निर्लेखनाची प्रक्रिया संथ गतीने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून कालबाह्य धोकादायक इमारती पाडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु शाळा निर्लेखनाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून, 34 प्रस्ताव तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन धोकादायक वर्गात शिक्षण घेत आहेत.

धोकादायक वर्गखोल्या पाडून नवीन खोल्या बांधकामासाठी निधीची कमतरता असल्याने प्रशासन धोकादायक शाळा पाडण्याबाबत केवळ कागदावरच गंभीर असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात निर्लेखनाची प्रक्रिया मात्र अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिह्यात आतापर्यंत 721 शाळांमधील सुमारे अडीच हजार वर्गखोल्या धोकादायक असल्याच्या कारणास्तव पाडण्यात आल्या. तथापि, तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर सादर केलेल्या प्रस्तावांची सद्यस्थिती शिक्षण विभागालाही सांगता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सुमारे 3 हजार 800 शाळा असून, वर्गखोल्यांचा आकडा मोठा आहे. त्यापैकी धोकादायक झालेल्या शाळाखोल्यांचा प्रस्ताव मुख्याध्यापक तसेच तालुकास्तरावरून जिल्हा परिषदेकडे पाठवला जातो. त्यानंतर ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ व इतर कार्यवाहीसाठी शिक्षण विभाग हे प्रस्ताव बांधकाम विभागाला सादर करतात. पुढे बांधकाम विभागाकडून तत्काळ दखल घेऊन खोली पाडण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जातो.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तालुकास्तरावरून शाळा निर्लेखनाच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला होता. त्यात 34 प्रस्ताव तालुकास्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले. परंतु तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर शिक्षण विभागात सादर केलेल्या प्रस्तावांचा आकडा गुलदस्त्यात आहे. मागील काही वर्षांत पाडलेल्या शाळांचा अहवाल पुढे करून शिक्षण विभाग सारे काही आलबेल असल्याचे भासवत आहे. प्रत्यक्षात आजही अनेक विद्यार्थी धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुकास्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव

z अकोले – कोल्हटवाडी रतनवाडी 4, संगमनेर – खांडगाव, माळवाडी, बोटा, संगमनेर खुर्द, आश्वी बुद्रूक – 5, कोपरगाव – काळेगाव थडी, जेऊर कुंभारी, ब्राह्मणगाव – 5, राहाता – बिरेगाव 1, नेवासा – सोनई ऊर्दू 2, शेवगाव – रांजणी, ढोरसडे – 6, श्रीगोंदा – भापकरवाडी, हंगेवाडी 5, नगर – नागरदेवळे, आडगाव 6.