नगर सिव्हिल अग्नितांडव – लेखी आश्वासनानंतर डॉक्टर, परिचारिकांचे आंदोलन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात इतर डॉक्टर आणि परिचारिकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन रुग्णालय प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. यानुसार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना संरक्षण देण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागात आग लागली होती. यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शासनाने सहा डॉक्टर आणि परिचारिका कर्मचाऱयांवर निलंबन, सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली होती. तसेच पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करून एक डॉक्टर आणि तीन परिचारिकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व चतुर्थश्रेणी कामगारांनी 9 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होते. त्यानंतर तब्बल 11 दिवसांनंतर आज (दि. 19) जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी संघटना यांच्यामध्ये चर्चा होऊन जिल्हा आरोग्य रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी लेखी आश्वासन दिले आहे.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक महावीर कटारिया यांनी संघटनेच्या सदस्यांना लेखी आश्वासन पोहोच केले. यावेळी, डॉ. मनोज घुगे, राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे, सचिन बैद, इंदिरा दुगलज, विशाल चव्हाण, डॉ. प्रसाद सायगावकर आदी उपस्थित होते.

राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे म्हणाल्या, तांत्रिक बाबी सुधारल्या जातील. याबाबत आवश्यक उपाययोजना केल्या जातील, यासाठी सार्वजनिक विभागाच्या विद्युत विभागाला आदेश दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सर्वसामान्य रुग्ण हे आमचे दैवत असून, त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी आम्ही काम बंद आंदोलन मागे घेण्याचे ठरवले आहे. प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन आणि आमच्या कर्मचाऱयांवर झालेल्या कारवाईविरोधातील लढा यापुढेही सुरू राहील, अशी माहितीही आंधळे यांनी दिली.

राज्य महिला आयोगाने मागितला कारवाईचा अहवाल

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीमध्ये 12 निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला. याबाबतीत राज्य सरकार संवेदनशील आहे. घटनेची चौकशी करताना, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स व एक वॉर्ड बॉय यांचे निलंबन करण्यात आल्याचे समजले; परंतु याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी असलेल्या विशाखा शिंदे या अस्थिरोग विभागात शिकणाऱया विद्यार्थिनी असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणते निकष लावण्यात आले, तसेच संबंधित विभागातील रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती का? किंवा रुग्णालय प्रशासनाने तसे आदेश दिले होते का? याबाबतीत सद्यःस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाने मागविल्याचे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले आहे.

अटकेतील डॉक्टर,परिचारिकांना सशर्त जामीन

जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारजणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुह्यात विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली होती. त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. यानंतर त्यांना जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. परिचारिका पठारे, शेख आणि आनंत यांच्या वतीने ऍड. महेश तवले, तर डॉ. शिंदे यांच्या वतीने ऍड. योहान मकासरे यांनी बाजू मांडली. सरकारपक्षाच्या वतीने ऍड. अनिल ढगे यांनी बाजू मांडली. तपासी अधिकारी संदीप मिटके यावेळी हजर होते. न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच पोलिसांना सहकार्य करणे आणि जिल्हा न सोडण्याच्या अटीवर जामीन दिला आहे.