
नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ूल्ड बँकेच्या शेवगाव शाखेतील बहुचर्चित सोनेतारण घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 27 किलो 351 ग्रॅम सोनेतारण ठेवलेल्या 367 पिशव्यांपैकी 347 पिशव्यांमध्ये खोटे सोने, तर इतर 20 पिशव्यांमध्ये सोन्याच्या किमतीपेक्षा अधिक रकमेचे कर्ज मंजूर करत बँकेची फसवणूक व 5 कोटी 30 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 159 कर्जखातेदारांसह गोल्डव्हॅल्यूअर विशाल गणेश दहिवाळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे शेवगाव शाखाधिकारी अनिल वासुमल आहुजा (वय 56) यांनी याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरण चर्चेत आहे. पहिल्यांदा फेब्रुवारी 2020 मध्ये शेवगाव शाखेतील 380 पिशव्यांचे लिलाव आयोजित करण्यात आले होते. यात 6 लिलाव पार पडले. नंतर तीन पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. इतर पिशव्यांमध्येही बनावट सोने आढळून येण्याची शक्यता असल्याने त्याची शहानिशा, तपासणी व पूनर्मुल्यांकन करण्यासाठी व्यवस्थापकीय समितीने 15 फेब्रुवारी 2020 रोजी तपासणी अधिकारी म्हणून मनोज फिरोदिया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर फिरोदिया व बँकेच्या शाखाधिकाऱयांनी संबंधित कर्जदारांना त्यांच्या तारण दागिन्यांची तपासणी, शहानिशा करण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. तपासणी कालावधीत सात सोनेतारण कर्जखातेदारांनी त्यांची खाती बंद करून दागिने सोडवून नेले. मात्र, इतर खातेदारांनी बँकांच्या नोटिसांना प्रतिसाद दिला नाही. बँकेने लिलावासाठी जाहिराती देऊनही त्यावेळी कर्ज खातेदार उपस्थित राहिलेले नाहीत.
बँकेने नोटीस दिल्यानुसार 364 सोनेतारण पिशव्यांमधील दागिन्यांच्या लिलावाची प्रक्रिया 23 जून 2021 रोजी लिलावाची प्रक्रिया गोल्डव्हॅल्यूअर व खातेदारांच्या अनुस्थितीत पार पडली. त्यासाठी बँकेने कृष्णा गोपीनाथ डहाळे यांची गोल्डव्हॅल्यूअर म्हणून नियुक्ती केली. पंचांसमक्ष लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या पाचही पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया थांबविण्यात येऊन 24 ते 29 जून या कालावधीत इतर पिशव्यांमधील दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यात 364 पैकी 20 पिशव्यांमध्ये काही दागिने सोन्याचे आढळून आले. गोल्ड व्हॅल्यूअरने त्याचे मूल्य 11 लाख 29 हजार 480 रुपये दाखविले होते. मात्र, त्याची तपासणी केल्यावर वजनात तफावत आढळून आली. या 20 पिशव्यांमधील दागिन्यांचे मूळ व्हॅल्यूएशन 3 लाख 48 हजार 880 रुपये असल्याचे समोर आले. तर, इतर 344 पिशव्यांमधील दागिने बनावट आढळून आले.
बँकेची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका
फेब्रुवारी 2020 मधील लिलावावेळी आढळलेल्या 3 पिशव्या व जून महिन्यातील लिलावावेळी आढळलेल्या 344 पिशव्या अशा 347 पिशव्यांमध्ये पूर्णपणे खोटे सोने असल्याचे तपासणीत समोर आले. तर, 20 पिशव्यांमध्ये मूळ सोन्याच्या किमतीपेक्षा व वजनापेक्षा वाढीव वजन व किंमत दाखवून जादा रकमेचे कर्ज घेण्यात आले. त्यामुळे एकूण 159 कर्जदार व गोल्ड व्हॅल्यूअर विशाल दहिवाळकर यांनी व त्यांना सहकार्य करणाऱया इतरांनी बँकेत तब्बल 27 किलो 351 ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून कर्जापोटी एकूण 5 कोटी 30 लाख 13 हजारांच्या रकमेची उचल घेऊन त्याची परतफेड न करता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व कर्जाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शेवगाव शाखेचे शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार 159 कर्जदारांसह गोल्ड व्हॅल्यूअर व इतर सहकार्य करणाऱयांविरोधात फसवणूक, रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करत आहेत.



























































