नगरमध्ये अतिवृष्टीमुळे अतिदुर्गम कुमशेच ग्रामस्थांचे हाल; घराच्या भिंती पडल्या, जनावरे दगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे अकोले तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्य़ा अतिदुर्गम कुमशेत गावात आदिवासी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पावसामुळे गावातील काही घरांच्या भिंती पडल्या असून, जनावरे दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत.

गेल्या सहा-सात दिवसांपासून कुमशेत गावात जोरदार वादळी वाऱ्य़ासह अतिवृष्टी होत आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेचे टोक असणाऱ्य़ा कुमशेत या निसर्गरम्य गावाला सध्या पावसाने झोडपून काढले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. त्यातच पाच-सहा दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने आणि पावसाचा तडाखा आणखीच वाढल्याने येथील घरांची पडझड झाली असून, घरांना नुकसान होत आहे. आदिवासी बांधवांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, तसेच शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाने शेतीचे बांध फुटले आहेत. काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे. पावसाने थंडी वाढली असून, या गारठ्याने जनावरे मेली आहेत. त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी घरांचे पंचनामे केले आहेत.

भीमा चिमा असवले, सयाजी चिमा असवले, बाळू बुधा बारामते, तुकाराम चिमा असवले या आदिवासी शेतकऱ्य़ांची जनावरे दगावली आहेत तसेच त्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने थोडा आसरा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वाऱ्य़ाने तोही टिकत नाही.

डोंगरदऱ्य़ांनी वेढलेल्या सह्याद्री रांगातील कुमशेत गावात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. या वर्षीही पावसाचे प्रमाण जास्त आहे. आजुबाजूचे सर्व ओढे-नाले, नद्या अक्षरशः पूर आल्याप्रमाणे वाहत आहेत. थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संपर्क करण्यात अडचणी होत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून विजेचा पत्ता नाही. वादळी वाऱ्य़ामुळे वीज टिकत नाही. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा अशाही पावसात वीज वितरण कंपनीचे वायरमन वीज चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरपंच असवले यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात कुमशेत गावाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अतिवृष्टी आणि वादळीवारा वाढल्यानंतर अधिकच हाल होतात. गावाचा अकोल्याशी संपर्क तुटतो. विजेचा वारंवार खेळखंडोबा झाल्याने मदतीसाठी संपर्क करणे अवघड होऊन बसते. संपर्काची साधने अत्यंत अल्प व उपलब्ध नसल्याने मदत मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क होईल अशी काहीतरी यंत्रणा कुमशेत गाव आणि परिसर उभारली जावी. – सयाजी असवले, सरपंच, कुमशेत.