नगरमधील रुग्णालयांची परतावा देण्याकडे पाठ, 52 लाखांपैकी रुग्णांपर्यंत पोहोचले केवळ पावणेदोन लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना उपचारांसाठी नियमापेक्षा जास्त शुल्कआकारणी करणाऱ्य़ा रुग्णालयांनी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना 52 लाख 39 हजार रुपये अदा करण्याचा आदेश महापालिकेने दिला होता. तथापि, आतापर्यंत अवघे एक लाख 71 हजार रुपयेच रुग्णांपर्यंत पोहोचले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहुतेक रुग्णालयांनी ही रक्कम अदा करण्याकडे पाठ फिरविली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्य़ा ज्या रुग्णालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या दरसूचीपेक्षा जास्त दर आकारले, त्यांची तपासणी करण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला होता. सहा ऑडिटर्सच्या पथकाने या बिलांची तपासणी करून ती बिले पुढील निर्णयासाठी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीसमोर ठेवली आहेत.

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे समितीचे सदस्य सचिव असून, लेखाधिकारी प्रवीण मानकर सदस्य आहेत. उपचारांपोटी एक लाखापेक्षा जास्त आकारणी केलेल्या 574 बिलांची पहिल्या टप्प्यात तपासणी झाली. 416 बिलांमध्ये त्रुटी आढळल्या. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा 79 लाख 10 हजार 450 रुपये जास्त आकारले होते.

समितीने महिनाभरापूर्वी 98 रुग्णांच्या बिलांपोटी 11 लाख वसूल करून रुग्णांना अदा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने नगर शहरातील 14 रुग्णालयांना नोटिसा पाठवून रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी केवळ दोन रुग्णालयांनी 30 नोव्हेंबरअखेर एक लाख 71 हजार 140 रुपये जमा केल्याची नोंद मनपाकडे आहे. अद्ययावत माहिती संकलनाचे काम सुरू आहे. शासनाचा आदेश असतानाही रुग्णालयांनी या रकमा का अदा केल्या नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. वसुलीची रक्कम वाढण्याचीही शक्यता आहे.