
लम्पी स्किन या रोगाला थोपवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जोरदार लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र, लम्पीग्रस्तांचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. दोन दिवसांत जिह्यात नव्याने लम्पीची लागण झालेली जनावरे आढळून आल्याने बाधित जनावरांची संख्या आता 221वर पोहोचली आहे, तर 14 गायी लम्पीने दगावल्या आहेत.
जनावरांच्या या आजारामुळे सर्व तालुक्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. अनेक जनावरांना ताप आल्यामुळे तसेच लम्पी आजाराची लक्षणे दिसू लागल्यामुळे अनेक ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यांमध्येही आता गर्दी दिसू लागली आहे. तर, काही ठिकाणी स्वतः डॉक्टर घरी जाऊन संबंधित जनावरांची तपासणी करत आहेत. या आजारामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडला असून, जनावरांना जगवायचे कसे, असाही प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकला आहे. अनेक ठिकाणी या आजारावर उपचार करण्यासाठी शेतकऱयांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात लम्पीची लागण झालेल्या जनावरांच्या उपचारासाठी पोहोचण्यात प्रशासन कमी पडत आहे.
राज्यात लम्पीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. यात नगर जिल्हा अव्वल स्थानी असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिह्यात आतापर्यंत लम्पीचे 14 बळी गेले असून, यात कर्जत 4, अकोले 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, राहाता 2, पारनेर 1 आणि पाथर्डी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.
जिह्यात आतापर्यंत 59 गावांत लम्पी रोगाची लागण झालेली जनावरे आढळली आहेत. या गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघात 295 गावांतील 3 लाख 41 हजार जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 75 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.
मागील आठवडय़ात जिल्हा प्रशासनाच्या वतीने या आजाराचा आढावा घेण्यात आला होता. या आढावामध्ये प्रत्येक तालुक्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. गावपातळीवर असणारे जनावरांचे डॉक्टर जनावरांना वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, पण काही ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याची अवस्था आहे. हा आजार रोखण्यासाठी राज्यपातळीवरून तत्काळ दखल घेऊन याचे नियोजन होणे गरजेचे आहे.-
नगर जिह्यात प्रतिबंधात्मक आदेश
नगर जिह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. एका राज्यातून दुसऱया राज्यात, एका जिह्यातून दुसऱया जिह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. लम्पी हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नगर जिह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संपूर्ण नगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.-
जामखेड तालुक्यातील 26 गावांमध्ये रेड अलर्ट
जामखेड – लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर, तालुक्यातील जवळा, लोणी, गुरेवाडी व मोहरी येथील चार नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, या सर्व गावांतील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तालुक्यातील मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या आठ गावांमधून लम्पी स्कीन आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यापैकी मोहरी, जवळा, लोणी व गुरेवाडी येथील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आतापर्यंत सात एपी सेंटर तयार करण्यात आली असून, त्यामध्ये एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

























































