नगरच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली, डझनचे दर 300 रुपयांनी कोसळले

चोखंदळ ग्राहकांचा आवडता हापूस रत्नागिरी, पायरी, म्हैसूर, लालबाग आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. आवक वाढल्याने आंब्यांचे भाव डझनामागे 300 रुपयांनी घसरले आहेत. आंब्याचे भाव कोसळल्याने ग्राहकांची चंगळ झाली आहे. सध्या आंब्याची मागणी बऱयापैकी असून, पुढील आठवडय़ात आंब्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱयांकडून वर्तविली जात आहे.

मद्रासमधून लालबागचा आंबा नगरला आला आहे. सुरुवातीला लालबाग आंब्याचा दर प्रतिकिलो 100 रुपये होता. सध्या निम्म्याहून अधिक भाव लालबागच्या आंब्याचा कोसळला आहे. 60 ते 70 रुपये प्रतिकिलो लालबागचा आंबा विकला जात आहे. केरळच्या हापूस पायरीनेही नगरकरांना भुरळ घातली आहे. हापूस पायरीचा दोन डझन पेटीचा दर 1000 ते 1200 रुपये इतका आहे. केरळच्याच पायरी आंब्याचा दोन डझन पेटीचा दर 1400 ते 1600 रुपये इतका आहे.

राज्यात प्रसिद्ध असलेला रत्नागिरीचा हापूस आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला असून, हापूस आंब्याच्या दोन डझन पेटीचा 1600 ते 1800 रुपये इतका भाव आहे. त्याचबरोबर देवगड हापूस आंब्याचा भाव 2000 ते 2200 रुपये इतका आहे. (प्रतिदोन डझनची एक पेटी). बदाम आंबा 110 रुपये किलोने विकला जात आहे. तसेच, म्हैसूर आंब्याच्या दोन डझनपेटीचा भाव 1400 ते 1600 रुपये इतका आहे.

बाहेरील राज्यांतून प्रसिद्ध आंबे नगरमध्ये दाखल झाले असून, ग्राहकांची बऱयापैकी मागणी आहे. यंदा लवकरच मोठय़ा प्रमाणावर आंब्याची आवक झाली. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने बाजारपेठेत आंबे लवकरच दाखल झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा आंब्याचा भाव प्रतिदोन डझन पेटीमागे 300 ते 400 रुपये कोसळला आहे. पुढील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणावर आवक वाढणार असल्याने आंब्याचे भाव आणखी कमी होणार आहेत.

– पप्पूशेठ आहुजा, आंबा व्यापारी.

आपली प्रतिक्रिया द्या