नगरमध्ये म्युकरमायकोसिसचे 180रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनातून रुग्ण बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकेसिस या आजाराने डोके वर काढले असून, नगर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या आजाराचे 180 रुग्ण सध्या नगर येथे उपचार घेत आहेत. यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण कोरोनातून बरा झाल्यानंतर आता नवनवे आजार पुढे येऊ लागले आहेत. या रुग्णांना दोन-तीन आठवडय़ांनंतर वेगवेगळे आजार झाल्याचे उपचारात निष्पन्न होत आहे.

आता म्युकरमायकेसिस या आजाराने डोके वर काढले असून, नगर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये 102 रुग्ण होते. आता यामध्ये वाढ झालेली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या 180वर झाली आहे. नगरच्या 10 खासगी रुग्णालयांमध्ये यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारासाठी लागणारे इंजेक्शन सध्या जिल्हा रुग्णालयांमध्ये मिळत आहे. जास्तीची इंजेक्शन्स मिळावीत, याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे व मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जास्त इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, म्युकरमायकोसिसच्या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असणाऱया रुग्णांची माहिती महानगरपालिका घेत आहे. जास्त इंजेक्शन्सचा साठा मिळावा, याकरिता प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.