
महापालिकेने शहरातील फेरीवाले व पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण केलेले आहे. यात ज्यांचा समावेश झालेला नाही, त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने विक्रेत्यांना संरक्षण दिले आहे. त्यानुसार ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशांची दोन दिवसांत तपासणी करून त्यांना बसण्यासाठी तात्पुरते धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
या संदर्भात मंगळवारी महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह हातगाडी विक्रेता, पथारी व्यावसायिक, घर-मालक संघटनांचे प्रतिनिधी संजय झिंजे, शाकीर शेख आदी उपस्थित होते.
महापालिकेचे पथविक्रेता धोरण अद्यापि तयार झालेले नाही. पथ विक्रेता कायद्यानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धोरण अंतिम होईपर्यंत फेरीवाले व पथ विक्रेत्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा देणे क्रमप्राप्त आहे. महापालिकेकडून शहरातील 2842 पथविक्रेते व फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. यात ज्यांची नोंदणी झाली नाही, त्यांच्यासाठी येत्या 15 दिवसांत पुन्हा सर्वेक्षण केले जात आहे. पथविक्रेत्यांना सध्या बसण्यासाठी येत्या दोन दिवसांत तपासणी करून तात्पुरते धोरण निश्चित करून देण्यात येईल. सध्या आहे त्या जागेवरच आम्हाला बसण्यास परवानगी द्यावी, ही मागणी मान्य होऊ शकत नाही. महापालिकेकडून सर्वेक्षणानुसार तपासणी करून त्यांना जागा निश्चित करून दिली जाईल, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, बाजारपेठेतील अतिक्रमणांचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. व्यापारी महासंघाने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेत पथविक्रेता समितीची बैठक घेण्यात आली. महापालिकेने पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी फेरीवाले व पथारी व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी केलेली आहे. मात्र, महापालिकेकडून या संदर्भात अद्यापपर्यंत अंतिम धोरण तयार झालेले नाही.




























































