
रेखा जरे खून प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्याविरुद्ध आता खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
नोकरी घालविण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आणि ती न दिल्याने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून आपली बदनामी केली, अशी फिर्याद एका महिलेने दिली आहे. यामध्ये बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे.
10 जुलै 2019 ते 12 फेब्रुवारी 2020 या काळात हा गुन्हा घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनत करून खंडणी मागितल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बोठे याने बदनामीच्या उद्देशाने काहीजणांना नाहक तक्रारी अर्ज करायला लावून चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या. मला त्रास देण्याच्या उद्देशानेच हे केले जात होते. या खोटय़ा आरोपांचे आपण तेव्हा खंडण केले होते.
यानंतर बोठे याने 11 ऑगस्ट 2019 रोजी चर्चा करण्यासाठी मला बोलविले. डॉ. भागवत दहीफळे हे सर्व गोपनीय माहिती मला पुरवितात, असे बोठे याने सांगितले. यातून बाहेर पडण्यासाठी तडजोड म्हणून बोठे याने 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, आपण त्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर त्याने जिल्हा क्षयरोग विभागातून माझी कंत्राटी नोकरी घालविण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणला. या कटात डॉ. भागवत दहीफळे सामील होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून बोठे व दहिफळेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
































































