संगमनेरात कत्तलखान्यांवर मोठी कारवाई, 31 टन गोमांस जप्त; 71 जनावरांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंशांच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास 62 लाख रुपयांचे तब्बल 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, 71 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

बाहेद कुरेशी, मुदसर हाजी, नवाज कुरेशी, जहीर अवर कुरेशी, परवेज कुरेशी, कलीम सलीम खान, अबीदुरहक अब्दुल जवर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे असून, कलीम सलीम खान व अबीदूरहक अब्दुल जवर यांना अटक करण्यात आली आहे. सहायक फौजदार रफियोद्दीन शेख यांनी फिर्याद दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील यतींद्र कांतिलाल जैन यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांबाबत सविस्तर माहिती देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, विजय करे यांना जैन यांच्यासह घटनास्थळी जाऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांनी जैन यांच्यासह नगर, श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांच्या मदतीने भारतनगर व जमजम कॉलनी परिसरातील कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा घातला. यावेळी सुरू असलेल्या पाच कत्तलखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनावरांची कत्तल झाल्याचे व अनेक जनावरे कत्तलीच्या वाटेवर असल्याचे भयानक दृश्य पोलीस पथकाला दिसले.

पोलिसांची चाहूल लागताच कत्तलखान्यांचे मालक कामगारांसह पळून गेले. पोलिसांना कारवाईसाठी सर्व कत्तलखान्यांचे दरवाजे तोडावे लागले. यावेळी आढळून आलेली गोवंश जनावरे, कापलेले मांस इतक्या मोठय़ा प्रमाणात होते की शनिवार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईदरम्यान कत्तलखान्यांच्या परिसरात वारंवार तणावही निर्माण होत होता. काही टवाळखोरांनी पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी दगडफेक करून रस्त्यावरील पथदिवे फोडण्याचे उद्योग केले. मात्र, पोलिसांनी त्याला न जुमानता जमाव पांगवला व आपली कारवाई सुरूच ठेवली.

वारंवार कारवाया करूनही बेकायदा कत्तलखाने सुरूच

राज्यात संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने कुप्रसिद्ध आहेत. येथील भारतनगर, जमजम कॉलनी, मदिनानगर, मोगलपुरा या भागात मोठे आणि अनेक छोटे कत्तलखाने आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गोवंशाची कत्तल करून त्यांचे मांस मुंबई, पुणे, नाशिक, गुलबर्गा (कर्नाटक), मालेगाव व संभाजीनगर येथे पाठवले जाते. वारंवारच्या कारवायांनंतरही येथील कत्तलखाने बंद होत नाहीत. शनिवारच्या कारवाईने स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत पोलिसांनी जमजम कॉलनीतील वाहीद कुरेशी व मुद्दसर हाजी याच्या वाडय़ातून 24 लाख रुपये किमतीचे 12 हजार किलो गोवंशाचे मांस, 4 लाख रुपये किमतीची 30 जिवंत जनावरे, 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा टेम्पो, नवाज कुरेशी याच्या वाडय़ातून 20 लाख रुपये किमतीचे 10 हजार किलो गोवंशाचे मांस, 5 लाख 45 हजार रुपये किमतीची 41 जिवंत जनावरे, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो, जहीर कुरेशी याच्या वाडय़ातून 11 लाख रुपये किमतीचे 5 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, परवेझ कुरेशी याच्या वाडय़ातून 7 लाख रुपये किमतीचे 3 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, तसेच कत्तलखान्यांच्या बाहेरील बाजूला उभे असलेले 18 लाख रुपये किमतीचे दोन टेम्पो, नवाज कुरेशी याच्या कार्यालयावरील छाप्यात 4 लाख 28 हजारांची रोकड व 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि या सर्व कत्तलाखान्यांमध्ये कत्तलीसाठीचे साहित्य असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.