नगर जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा एकदा गजबजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असणाऱ्या शाळांचे दरवाजे सोमवारपासून उघडणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 26, तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या 96 अशा शाळा असून, यात कोरोनाचा प्रतिबंध असणाऱ्या भागातील शाळा वगळून उर्वरित ठिकाणी शंभर टक्के शाळा सुरू होण्याची आशा आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यात गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शोलय पोषण विभागाचे अधीक्षक, केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती (विशेष शिक्षक, विशेष तज्ञ, विषय साधन व्यक्ती), तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही शाळा भेटी करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये शाळा सुरळीत व उत्साहवर्धक वातावरणात सुरू राहतील यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांनाही आपापल्या भागातील शाळा सुरू राहण्यासाठी प्रेरक शाळा भेटी करण्याबाबत विनंती करावी. शाळा भेटीचा अहवाल दुपारी 1.30 वाजेपर्यंत न चुकता नगरला पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

200 शाळा बंद राहणार

जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंत शाळांची संख्या 2 हजार 122 असून, यातील सुमारे 200 शाळा सुरू होऊ शकणार नाहीत. उर्वरित शाळा नियमितपणे सुरू होतील, असा शिक्षण विभागाचा होरा आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सध्या आठवी ते बारावीपर्यंतच्या 225 शाळा सुरू असून त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 61 गावांत दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला असून, या ठिकाणी शाळा बंद राहणार आहेत.

सोलापूर शहरातील 155 शाळा सुरू होणार

सोलापूर – मनपा क्षेत्रातील 155 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोमवारपासून सुरू करण्यासाठी पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत शहरात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. विद्यालयाच्या पूर्व तयारीबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली व त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना देण्यात आला. विद्यालय सुरू झाल्यानंतर भेटी देऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.