नगर जिल्ह्यात उद्यापासून शाळा सकाळी भरणार, जिल्हा परिषद-सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ सोमवार (दि. 4) पासून सकाळची करण्यात आली आहे. सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत जिल्ह्यातील सर्व शाळा भरणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी हेदेखील सल्लागार समितीच्या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.

नगरसह राज्यात उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या पहिली ते 9वी आणि 11वीच्या सर्व शाळांची वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसह गुरुकुल शिक्षक मंडळ आणि शिक्षक समन्वय समितीची होती. सध्या उष्णतेची लाट असून, सकाळी 10 पासून सूर्य आग ओकत आहे. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने झेडपीच्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती. शुक्रवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आणि सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यात सोमवारपासून सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत जिल्ह्यातील शाळा भरणार आहेत. पाच तास अध्यापन होणार असून, जेवणाची सुट्टी अर्ध्या तासाची राहणार आहे.

पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा चालू महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा. 100 टक्के उपस्थितीलाही परवानगी देण्यात आली

नगरचा पारा 43 अंशांवर

मार्चचा शेवटचा आठवडा तप्त गेल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून सूर्य आणखी तळपायला सुरुवात झाली आहे. शनिवारी नगरमध्ये कमाल तापमान 43.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक तप्त दिवस ठरला. कमाल तापमानात आज सरासरीच्या तुलनेत 6 अंशाने वाढ झाली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा आज शेवटचा दिवस आहे. असे असले तरी उद्यापासून तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही. 5 एप्रिलनंतर सायंकाळी आकाश ढगाळ होण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.