श्रीगोंदा – बँकेने जमीन जप्तीची नोटीस दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा बँकेने जमीन जप्तीची नोटीस दिल्याने श्रीगोंद्यातील पेडगाव येथील शेतकरी विष्णू रामभाऊ कानडे ( वय वर्षे 48) यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत मयत शेतकऱ्याचा मुलगा अमोल विष्णू कानडे याने तक्रार अर्ज दाखल करत बँकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पेडगाव सहकारी सेवा संस्थेत गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. सेवा संस्थेचे कर्मचारी तसेच श्रीगोंदा सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केला होता असे तक्रारदारांचे म्हणणे होते. संस्थेचे ऑडिट करणारे ऑडिटरने आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये तसा उल्लेखही केला आहे. त्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून एवढी मोठी रक्कम वसुली होणार नाही असा समज करत बँकेने कलम 88 नुसार चौकशी लावून त्यासाठी संचालकांना जबाबदार धरण्यात आले. त्यांच्याकडून वसुलीचा तगादा लावण्यात आला होता.

मयत विष्णू कानडे हे या सेवा संस्थेत तत्कालीन संचालक होते. संचालकांनी निश्चित केलेली रक्कम भरली नाही तर त्यांच्या जमिनीची जप्ती करून विक्री करण्यात येईल व त्यातून ही रक्कम वसूल केली जाईल अशी नोटीस सहकारी बँकेने 28 एप्रिल 2023 रोजी सर्व संचालकांना पाठवून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. आपला या भ्रष्टाचाराशी काडीचाही संबंध नाही किंवा एका पैशाचाही आपण लाभार्थी नसल्यामुळे, आपण एवढी रक्कम कोठून आणि कशी भरणार असा प्रश्न माजी संचालक विष्णू कानडे यांना पडला. जिल्हा बँकेच्या या कारवाईच्या धास्तीने व विनाकारण बदनामीच्या भीतीपोटी विष्णू रामभाऊ कानडे यांनी झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. लोणी खाणारे मोकाट सोडून वसुलीचे भरपाई मात्र संचालकाकडून करणे हा कुठला न्याय? असा प्रश्न विचारत मयत विष्णू कानडे यांचे चिरंजीव अमोल कानडे यांनी भ्रष्टाचारात आमचा कोणताही संबंध नसताना आमच्या कुटुंबप्रमुखाला आपले जीवन गमवावे लागले. आमचे कुटुंब पोरके झाले आहे, आपण आम्हाला न्याय द्यावा अशी आर्त हाक मयत विष्णू कानडे यांच्या पत्नी व मुलाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.