
नगर शहरातील बंद पथदिव्यांचे भाग्य आता उजळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मनपा यंत्रणेद्वारे होणारी त्यांची देखभाल दुरुस्ती व नवी उभारणी आता खासगीकरणातून केली जाणार आहे. पथदिव्यांच्या उभारणी व देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला महिन्याला सुमारे 70 लाखांचा खर्च होतो. मात्र, हीच सेवा खासगीकरणातून दिली तर हा खर्च सुमारे 57 लाखापर्यंत होणार आहे. यातून महापालिकेचे सुमारे 13 लाख रुपये वाचणार आहेत. शिवाय वीज, साहित्य खरेदी व देखभाल दुरुस्तीची कटकटही थांबणार आहे. याबाबत महापालिका स्थायी समिती उद्या (दि. 3) होणाऱया सभेत निर्णय घेणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा उद्या (दि. 3) दुपारी सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मनपाच्या विविध विभागात रिक्त जागांवर मानधनावर कर्मचारी नियुक्ती, चुकीच्या पाणीपट्टी व घरपट्टी आकारणीची माफी अशा नेहमीच्या विषयांसह पथदिवे खासगीकरणाचा, मोकाट जनावरे पकडण्याच्या निविदेचा तसेच सावेडीच्या फुले मार्केटमध्ये सीटीस्कॅन सेंटर मशीन बसवण्याचा विषयासह तब्बल 29 विषय अजेंडय़ावर आहेत. या सर्व विषयांवर स्थायी समिती अंतिम निर्णय घेणार आहे.
नगर महापालिका हद्दीत सुमारे 30 हजारांहून अधिक पथदिवे आहेत. यापैकी 25 ते 30 टक्के पथदिवे कायमस्वरूपी बंदच असतात. या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती होत आहे. तसेच बंद पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत साहित्य खरेदी हा कळीचा मुद्दा असतो. या विषयावर नगरसेवक महासभेत प्रशासनावर तुटून पडतात. विद्युत साहित्य खरेदी व त्याचे वाटप यात होणारे राजकारण यामुळे पथदिव्यांचा विषय प्रत्येक सभेत गाजत असतो. या पार्श्वभूमीवर आता पथदिव्यांचे खासगीकरण करण्याचे मनपाने ठरवले आहे. डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट, मेन्टेनन्स, मॉनिटाईज ऍण्ड ट्रान्सफर (डीबीएफओएमएमटी) या नव्या खासगीकरण तत्त्वावर स्मार्ट एलईडी पथदिवे बसवणे व 7 वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. ‘ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला काम देण्याचे ठरत आहे. त्याचा अंतिम निर्णय स्थायी समिती घेणार आहे.
वीजवापराची तपासणी
पथदिवे खासगीकरणातून चालवण्याच्या योजनेबाबत पथदिव्यांसाठीच्या वीज वापराची तपासणी दोन संस्थांनी केली आहे. पथदिवे खासगीकरणाचा ठेका घेऊ इच्छिणाऱया ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन आणि थर्ड पार्टी संस्था म्हणून संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या एनर्जी कन्झम्प्शनमध्ये तफावत आली आहे. शासकीय अभियांत्रिकीच्या तपासणीनंतर 57 लाख 33 हजारांचे देयक देणे अपेक्षित आहे. तसेच पथदिव्यांचे वीजबिल 11 लाख 46 हजारांचे येणार आहे.
सध्याचा खर्च 57 लाखांचा
मनपाचा सध्याचा पथदिव्यांचा खर्च सुमारे 57 लाखांचा आहे. यात मासिक वीजबिल 40 लाख 37 हजारांचे, कर्मचारी, आस्थापना खर्च 4 लाख 43 हजार व मासिक विद्युत साहित्य खरेदी सुमारे 12 लाख 11 हजारांची आहे. सद्यःस्थितीत 25 ते 30 टक्के पथदिवे बंद असताना हा एवढा खर्च होत आहे. या पार्श्वभूमीवर पथदिव्यांचे खासगीकरण केले तर 100 टक्के पथदिवे सुरू राहणार असून, खर्चातही 13 लाखांची बचत होणार आहे.
























































