
नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आदेश विजय म्हस्के (वय 18, रा. पवारवस्ती, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरूवारी सकाळी महाविद्यालयात आलेल्या अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी खिडकीतून शेजारच्या रिकाम्या वर्गात पाहिले असता, आदेश म्हस्के याने आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली.
प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांसमक्ष पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, दोन दिवस शाळेत येणार नाही, अशी शिक्षकांची परवानगी घेतो, असे सांगून बुधवारी दुपारी आदेश घराबाहेर पडला होता. रात्री घरी न आल्याने त्याच्या आई लक्ष्मीबाई म्हस्के यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. याबाबत आदेशचा चुलतभाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांनी फिर्याद दिली.




























































