
विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 24 मुलांचा मृत्यू झाला होता. पण याच प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलांपैकी पहिल्यांदाच एक पाच वर्षीय मुलगा पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील या मुलाला सोमवारी दुपारी नागपूर एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी हा मुलगा बालरोग सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत होता. त्या वेळी तो हात-पाय हलवत खेळण्याचा प्रयत्न करत होता, तर त्याची आई त्याच्या शेजारी बसून त्याची काळजी घेत होती आणि वडील जमिनीवर झोपून रात्र काढत होते. इतर सर्व मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर असताना, याच मुलाची प्रकृची सुधारत होती. आता रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आई-वडील अखेर आपल्या सात वर्षांच्या मुलीला भेटणार आहेत, जी या काळात गावाकडे आजी-आजोबांकडे राहत होती.
24 ऑगस्ट रोजी खोकला आणि तापासाठी या मुलाला डॉ. प्रवीण सोनी यांच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते. तेथे त्याला कोल्ड्रिफ कफ सिरप देण्यात आले. नंतर या औषधात डायएथिलीन ग्लायकॉल हे अत्यंत विषारी रसायन असल्याचे निष्पन्न झाले. 31 ऑगस्ट रोजी मुलाची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला मूत्रपिंड निकामी होणे तसेच गंभीर मेंदूविषयक गुंतागुंत निर्माण झाली. सुरुवातीला नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली, वडिलांची नोकरी गेली आणि अखेर 11 सप्टेंबर रोजी मुलाला एम्स नागपूरमध्ये हलवण्यात आले. तेथे दाखल होताना त्याची अवस्था अत्यंत गंभीर होती. तो खोल कोमात होता, त्याचा रक्तदाब कमालीचा खालावला होता, अनेक अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होते आणि मेंदूच्या स्टेमचे रिफ्लेक्स जवळपास दिसत नव्हते. तातडीने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि काही तासांतच आपत्कालीन डायलिसिस करण्यात आले.
डॉक्टरांच्या मते, सुरुवातीचा अंदाज अत्यंत निराशाजनक असतानाही जीवनरक्षक उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू न्यूरोलॉजिकल सुधारणा दिसू लागली, मात्र उपचारादरम्यान मुलाला तीव्र सेप्टिसीमिया, शॉक, हृदयासाठी विशेष सहाय्य, अनेक वेळा रक्त चढवणे, दीर्घकाळ अँटिबायोटिक उपचार आणि दीर्घकालीन श्वसनासाठी ट्रॅकिओस्टॉमी करावी लागली. जवळपास तीन महिने सलग अतिदक्षता उपचार घेतल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि हाय-डिपेंडन्सी युनिटमध्ये हलवण्यात आले. योग्य पोषण, शारीरिक आणि मेंदूविषयक पुनर्वसनामुळे तो हळूहळू बोलू लागला, प्रतिसाद देऊ लागला आणि पालक व डॉक्टरांशी संवाद साधू लागला.
या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या तपासणीत त्याच्या ऑप्टिक नर्व्हला इजा झाल्याचे आणि तीव्र दृष्टिदोष असल्याचे समोर आले होते. वेळेवर नेत्रतज्ज्ञ उपचार आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपीनंतर आता त्याला प्रकाशाची जाणीव होऊ लागली आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दृष्टी थोडी सुधारली असली तरी अजून तो स्पष्ट पाहू शकत नाही. दिवस-रात्र ओळखता येते, मात्र व्यक्ती ओळखण्याइतपत दृष्टी आलेली नाही आणि पुढील काळात त्यावर लक्ष ठेवले जाईल. सध्या विशेष उपचारांची गरज नसून योग्य पोषण, सुरक्षित वातावरण आणि शारीरिक पुनर्वसन पुरेसे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकांना देण्यात आल्या असून पुढील तपासणीसाठी मुलाला पुन्हा बोलावण्यात आले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी सांगितले की, अत्यंत खराब प्रारंभिक अंदाज असूनही उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय हा एम्सच्या मूल्यांचे प्रतीक आहे आणि प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. त्यांनी बालरोग विभाग, PICU टीम, परिचारिका आणि प्रशासनाच्या समन्वयित प्रयत्नांचे कौतुक केले.




























































