पगार नाही, प्रमोशन नाही; एअर इंडियाच्या 120 वैमानिकांचे सामूहिक राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
air-india-new
प्रातिनिधिक फोटो

 60 हजार कोटींहून जास्त कर्जात बुडालेल्या सरकारी एअर इंडिया कंपनीच्या 120 वैमानिकांनी सामूहिक राजीनामे दिले. गेले अनेक महिने वेळेवर पगार नाही, कित्येक वर्षे प्रमोशन नाही. त्यामुळे संतापलेल्या वैमानिकांनी एअर इंडियाच्या प्रशासनाकडे राजीनामे सोपवले.

केंद्राने तोटय़ात असलेल्या एअर इंडियाला विकण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर वैमानिकांनी प्रशासनाकडे वेळेवर पगार आणि रखडलेली बढती द्यावी अशी मागणी केली होती, मात्र या दोन्ही मागण्या मान्य झाल्या नाहीत. नवीन वैमानिकांना गेली पाच वर्षे कंत्राटी पद्धतीने राबवले गेले, मात्र पाच वर्षांनंतरही पगारात वाढ केली नाही. इतर विमान कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळेल या आशेने वैमानिकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत असे वैमानिकांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी हवाई इंधनाची थकबाकी दिली नाही म्हणून सरकारी इंधन कंपन्यांनीच एअर इंडियाला इंधनपुरवठा बंद केला नव्हता.

हवाई सेवेवर परिणाम नाही!
आमच्याकडे अतिरिक्त वैमानिक आहेत. त्यामुळे वैमानिकांनी एवढय़ा मोठय़ा संख्येने सामूहिक राजीनामे देऊनही एअर इंडियाच्या हवाई सेवेला फटका बसणार नाही, असा विश्वास एअर इंडियाने व्यक्त केला आहे. एअर इंडियाकडे दोन हजार वैमानिक असून त्यापैकी 400 एक्झिक्युटिव्ह आहेत.