एअर इंडियाच्या विमानाला मिळाली बॉम्बची धमकी; बर्मिंगहॅम-दिल्ली फ्लाइट सौदी अरेबियात उतरली

बर्मिंगहॅम (यूके) येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI114 ला शनिवारी मध्यरात्री बॉम्बची धमकी मिळाली. या धमकीनंतर विमानाला सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर उतरवण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. सौदी अरेबियातील स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी विमानाची पूर्ण तपासणी केली, ज्यामध्ये कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, “फ्लाइट AI114 ला 21 जून रोजी बॉम्बची धमकी मिळाल्याने ती रियाध येथे उतरवण्यात आली. विमानाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.”

या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. रियाध विमानतळावर विमानाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना लवकरात लवकर दिल्लीला पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियाने सांगितले की, ही घटना मध्यपूर्वेतील हवाई वाहतूक बंदी, युरोप आणि पूर्व आशियातील काही विमानतळांवर रात्रीच्या कर्फ्यू, हवाई वाहतूक कोंडी आणि अप्रत्याशित तांत्रिक अडचणी यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.