दिल्लीच्या विमानाचे फुकेट एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, एअर इंडियाच्या प्रवाशांचा पुन्हा उडाला थरकाप

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेला 24 तास उलटत नाही तोच दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमधील फुकेट विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन कॉल आला आणि सुरक्षा यंत्रणासह सर्वांची घाबरगुंडी उडाली. थायलंडच्या आकाशात विमानाला काही वेळ घिरटय़ा घालाव्या लागल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला. सुखरूप लँडिंगनंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एअर इंडियाच्या एआय 379 विमानाच्या बाबतीत हा प्रकार घडला. विमानात एकूण 156 प्रवासी होते. बॉम्बच्या धमकीचा पह्न कॉल आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा दक्ष राहिल्या. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी तत्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. विमान हवेत असतानाच धमकी दिली गेली होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची तारांबळ, तर विमानातील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. लँडिंगसाठी सिग्नल मिळेपर्यंत विमानाने अंदमान समुद्राच्यावर हवेत घिरटय़ा घातल्या. त्यानंतर ते विमान पुन्हा फुकेट विमानतळावर उतरवले. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकांनी विमानातील सर्व वस्तू आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली. अहमदाबादची दुर्घटना ताजी असतानाच एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.

धमक्यांच्या फोन कॉल्सचे प्रमाण वाढले

हवाई मार्गाला आधीच दहशतवाद्यांचा धोका आहे. त्यात बॉम्बची धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी अशा धमक्यांच्या पह्न कॉल्सचे प्रमाण खूप होते. सुरुवातीच्या दहा महिन्यांत एक हजाराच्या आसपास कॉल्स आले होते. तेच सत्र यंदाही सुरू राहिल्याने विमान प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.