वाढत्या प्रदूषणामुळे साथीच्या आजारांतून बरे होणे कठीण; रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये वाढलेले प्रमाण

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाचा परिणाम आता साथीच्या आजारांच्या रुग्णांवरही दिसू लागला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हवेतील सूक्ष्म कण श्वसनमार्गांना चिघळवतात आणि त्यामुळे साध्या सर्दी खोकल्यातूनही बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, कोणताही पूर्वीचा आजार नसलेल्या निरोगी लोकांनाही खोकला-श्वास घेण्यातील अडचणींमुळे तब्येत सुधारायला उशीर होतो आहे. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

अनेक रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये गर्दी वाढली असून रुग्णांपैकी मोठा हिस्सा हा श्वसनासंबंधी दीर्घकालीन आजार असलेले किंवा बांधकाम सुरू असलेल्या परिसरात राहणारे लोक असल्याचे डॉक्टर सांगतात. माझगाव परिसरातील हवेची गुणवत्ता 11 नोव्हेंबर आणि पुन्हा सोमवारी 300 च्या पुढे गेल्याचे नोंदवले गेले. पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अभिजीत आहूजा यांच्या मते, गंभीर स्वरूपाचे इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा COPD असलेल्या रुग्णांवर बांधकामस्थळी वाढलेल्या धुळीचा सर्वाधिक दुष्परिणाम दिसतो.

मुलुंडच्या सिप्पी पटवारी यांनी आपल्या वृद्ध पालकांसाठी धूळरोधक जाळ्यांपासून एअर प्युरिफायरपर्यंत जवळपास दीड लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांचे वडील 75 वर्षांचे असून त्यांना ब्राँकियल अस्थमा आहे. तर आईला 68 वर्षांच्या असून त्यांना अस्थमा आणि अॅलर्जिक र्‍हिनायटिस आहे. कुटुंबाने बाहेर जाणे जवळपास बंद केले असून पटवारी स्वतःही दोन N95 मास्क लावूनच बाहेर पडते. “कोविडच्या काळातही एवढा खर्च केला नव्हता,” असे त्यानी सांगितले.

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. चेतन जैन यांच्या म्हणण्यानुसार, निरोगी व्यक्तींमध्येही वारंवार खोकला-श्वास घ्यायला त्रास होणे यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी झाल्याचे तपासणीत दिसून येते. “लोकांनी पुन्हा मास्किंग सुरू करणे गरजेचे आहे. बाहेरची कामे कमी करावी. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त उपाय लोकांच्या हातात नाहीत,” असे ते सांगतात.

डॉ. अनीता मॅथ्यू या इन्टर्नल मेडिसिन तज्ज्ञ सांगतात की, साथीच्या आजाराची वार्षिक लस घेणे विशेषतः ज्या लोकांना पूर्वीचे आजार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. “लस घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होते आणि नंतर मोठ्या वैद्यकीय खर्चापासून बचाव होतो,” असे त्या म्हणतात.

डॉक्टरांनी या ऋतूतील आणखी एका धोक्याकडे लक्ष वेधले आहे. अँटिबायोटिकचा चुकीचा वापर. “अनेकदा रुग्णांना होणारा खोकला किंवा त्रास हा धुळीमुळे किंवा व्हायरसमुळे असतो, बॅक्टेरियामुळे नव्हे. अशा वेळी अँटिबायोटिक काही उपयोगी पडत नाहीत. पण जलद आराम मिळावा म्हणून लोक गोळ्या घेतात आणि यामुळे प्रतिकारक्षमतेचा धोका वाढतो,” असे डॉ. मॅथ्यू स्पष्ट करतात.