
देशातील विमानतळ तसेच विमान कंपन्या चालवण्याची जबाबदारी सरकारने घेऊ नये, अशी माझी मनापासून इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. तिरुवनंतपुरम विमानतळाचे संचालन खाजगी कंपनीच्या हाती सोपवण्यास केरळ सरकारने विरोध केला आहे. त्यावर पुरी यांनी हे विधान केले आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या 19 ऑगस्टला झालेल्या बैठकीत विमानतळांच्या संचालनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी तिरुवनंतपुरम विमानतळ सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्त्वावर अदानी इंटरप्रायझेसला देण्याचा निर्णय घेतला गेला. याला केरळ सरकारकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पुरी यांनी सोमवारी नमो अॅपवर झालेल्या बैठकीत आपले मत नोंदवले. एअर इंडियाचे खाजगीकरण होणे ही चांगलीच गोष्ट असून चालू वर्षाच्या अखेरपर्यंत संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यात आम्हाला यश येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. देशांतर्गत विमान वाहतूक डिसेंबरअखेरपर्यंत पूर्णपणे पूर्वपदावंर येईल, असेही ते म्हणाले.

























































