विमानतळाच्या उद्घाटनाला ‘तारीख पे तारीख’; सप्टेंबरचा मुहूर्त हुकला, नवी मुंबईतून टेकऑफ डिसेंबरला

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून नवी मुंबईच्या उद्घाटनासाठी दिलेला ३० सप्टेंबरचा मुहूर्त अखेर हुकला आहे. उ‌द्घाटन सप्टेंबर महिन्यात होणार नसल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले असले तरी उद्घाटनाची पुढील तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उद्घाटनाची शक्यता शासकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या अंदाजानुसार उद्घाटन झाले तर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यास थेट डिसेंबर महिना उजडणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबरच्या आत होईल असा दावा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंगचे सीईओ अरुण बन्सल यांनी जाहीर केले होते. मात्र ही डेडलाईनही पुन्हा एकदा हुकली आहे. विमानतळाचे उद्घाटन आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे बोलले जात आहेत. जर हा मुहूर्त साधला गेला तरी या विमानतळावरून विमानांची सेवा सुरू होण्यास डिसेंबर उजाडणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर तिथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स) तैनात होणार आहे. सीआयएसएफला या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.

पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणार इव्हेंट
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी या विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी एअर फोर्सच्या लढाऊ विमानाचे लॅण्डिग करून मोठा राजकीय इव्हेंट साजरा केला होता. या निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागली होती. त्याच धर्तीवर राजकीय फायदा उचलण्यासाठी पालिका निवडणुकीच्या तोंडावर या विमानतळाचे उद्घाटन केले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गोव्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर ते विमानतळ सुमारे ४५ दिवसांनी सुरू झाले होते. सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्या विमानतळावरून पहिले टेकऑफ झाले होते. गोव्याच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीआयएसएफला तेवढाच कालावधी लागणार आहे. जर विमानतळाचे उद्घाटन आणखी काही दिवस पुढे गेले तर टेकऑफसाठी नवीन वर्षही उजाडणार आहे, असेही काही शासकीय सूत्रांनी सांगितले.