
प्रत्येक क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होताना दिसत आहे. मात्र जगभरात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या एआयवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. ‘द कार्बन ऍण्ड वॉटर फूटप्रिंट्स ऑफ डेटा सेंटर्स ऍण्ड व्हॉट धिस कुड मीन फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, या उद्योगातील पाण्याचा वापर बाटली बंद पाण्याच्या एकूण प्रमाणापेक्षाही जास्त झाला आहे. मोठय़ा लँग्वेज मॉडेल्स आणि जनरेटिव्ह एआय टूल्सना चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अवाढव्य डेटा सेंटर्समधील सर्व्हर थंड ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. मेटा कंपनीच्या न्यूटन काउंटीमधील जुन्या डेटा सेंटरमध्ये दररोज 5 लाख गॅलन पाणी वापरले जात असल्याची शक्यता आहे.
























































