
आजरा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात आल्या होत्या. याबाबत सुमारे 1081 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी नुकतीच पार पडली. त्यानुसार फक्त एकच हरकत स्वीकारण्यात आली, तर 63 जणांना मतदारयादीत समाविष्ट केले गेले असून, उर्वरित हरकती फेटाळण्यात आल्या.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजरा साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ झाला. या निवडणुकीतील कारखाना अंतर्गत विविध प्रकारच्या 166 संस्थांचे ठराव देण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या. दरम्यान, प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली. सभासदत्व रद्द केल्याबाबत 1080 हरकती आल्या होत्या. पण, त्यापैकी 63 जणांना कारखाना रेकॉर्ड तपासून मतदार यादीत समाविष्ट केले, तर 1017 जणांचे सभासदत्व रद्द केले. याबाबत आजरा कारखाना प्रशासनाने आपले म्हणणे सादर केले होते. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालकांनी संबंधित हरकती फेटाळल्या.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार 20 जूनपूर्वी आजरा कारखाना निवडणूक अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी अवघ्या महिनाभराचाच कालावधी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. या काळात प्रारूपच्या निवाडय़ानुसार पक्की मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर कारखान्याची पुढील निवडणूकप्रक्रिया सुरू होईल. पण जूनमध्ये पावसाला सुरुवात होणार असून, त्याकाळात कारखाना निवडणूक कार्यक्रम राबवणे तसे जिकिरीचे आहे. तरीही प्रादेशिक सहसंचालक आणि कारखाना प्रशासनाकडून तत्पर कार्यवाही होत राहिली तरच 20 जूनपूर्वी निवडणूक शक्य असेल; अन्यथा ऑक्टोबरपर्यंत निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे.
























































