
हिंदुस्थानच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी अखेर मंगळवारी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आगरकरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे हिंदुस्थान नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगरकरच्या वार्षिक मानधनातही घसघशीत वाढ केल्याचे समजते.
याआधीचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन प्रकरणानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 17 फेब्रुवारीपासून हे पद रिक्त होते. गेल्या दोन दिवसांपासून अचानक अजित आगरकर हा संघ निवड समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आला. मात्र अजित आगरकर व इतर काही दावेदार निवड समिती अध्यक्षाला मिळणाऱया पगाराबाबत फारसे समाधानी नव्हते. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱयांनी अजित आगरकरशी संपर्क साधत पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
सध्या निवड समिती अध्यक्षाला वर्षाला 1 कोटी रुपये पगार मिळतो, तर इतर सदस्यांना 90 लाख रुपये दिले जातात. अजित आगरकरने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला, तेव्हाच अध्यक्षपदासाठी त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आगरकरने यापूर्वी 2020मध्येदेखील निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज केला होता. मात्र बीसीसीआयने त्याची त्या वेळी निवड केली नव्हती.




























































