खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले

राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल होते, तर काही अधिकारी चक्क डुलक्या घेत होते. हा सर्व प्रकार बघताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले आणि या सर्व अधिकाऱ्यांना अजितदादांनी चांगलेच झापले. यापुढे बैठकीला येताना मोबाईल बाहेर ठेवा, असे आदेशच त्यांनी जारी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित केली होती.  पण मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त होते. हा सर्व प्रकार पाहून अजित पवार यांचा पारा चढला

सचिवांचीही कानउघाडणी

या बैठकीत अजित पवार यांनी केवळ कृषी अधिकाऱ्यांनाच नाही, तर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनाही फटकारले. तुम्ही सूट-बूटमध्ये राहतात. तुम्ही कोटही  घालता. इथे आपला प्रतिनिधी कोण आहे हे शेतकरी कसे ओळखणार? शेतकऱ्यांनीही चांगले कपडे घालावेत यासाठी काही काम केले पाहिजे.

बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचीही अजित पवार यांनी कानउघाडणी केली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असल्याचे कारण देत अधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाहीत; पण आजच्या या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवदेखील येथे उपस्थित आहेत, तरीही अधिकारी त्यांच्या मोबाईल पह्नमध्ये  व्यस्त असल्याचे दिसून आले.