
राज कपूर चित्रपटसृष्टीतील शो मॅन होते, तसे काहीजण सध्या शो मॅन झाले आहेत. गणपतीच्या दर्शनाला जावे, याबाबत दुमत नाही. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो. मात्र, आम्ही ज्यावेळी जातो, त्यावेळी कॅमेरे नेत नाही, सध्या काही लोकांना आता शोबाजीची सवय लागली आहे, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. सकाळीच अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राजकीय मुद्द्यांवरुन फटकेबाजी केली. नेत्यांचे गणपती दर्शन, दसरा मेळावा, ठाकरे विरुद्ध शिंदे या वादावर त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं.
गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आला आहे. पण याआधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. पण सध्या जावं लागतं. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय झाली आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना कुणाची, याचे उत्तर दसरा मेळाव्यानंतर मिळेल
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील जनता पाहत होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेनेचं नेतृत्व यापुढे उद्धव ठाकरे करतील. मात्र, सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनीच पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची? असं अजित पवार यांनी म्हणाले.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार नाहीत
काँग्रेसचे आमदार फुटणार का, याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची राजकीय भेट झालेली नाही. सध्या सोशल मिडीया काही बातम्या देत असते, ज्यात कोणतंही तथ्य नसतं, त्यामुळे अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या फक्त मिडीयातील चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्हीच विचार करा हे लोकशाहीला धरुन आहे का?
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांच्या यादीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असे ते म्हणाले.
































































