
‘स्वतःच सर्वेक्षण केले आणि जाहिरात केली. सर्वेक्षण कुणी केले, कुणी सांगितले आणि किती टक्के लोकांमध्ये सर्वेक्षण झाले याची कसलीच माहिती जाहिरातीत देण्यात आली नाही. अशा प्रकारे सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रमच आपल्या राज्य प्रमुखांनी केला आहे. अशी जाहिरात आपण कधी पाहिली नाही’, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली.
मुख्यमंत्री शिंदे आणि ही जाहिरात देणारे इतक्या लवकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले हेच मला कळत नाही, असे अजित पवार म्हणाले. जाहिरातीमधून बाळासाहेबांचा फोटो सोयिस्कररीत्या वगळला आहे, असे ते म्हणाले. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत, असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्ष स्वतःकडे खेचून घेतला. परंतु त्या जाहिरातीवर कुठेही बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचाही फोटो दिसत नाही,’ अशी सणसणीत टीका करत अजित पवार यांनी मिंध्यांना काटय़ावर घेतले आहे.





























































