सिंचन घोटाळ्यात अजित पवारांची ‘लेखी’ चौकशी सुरू, 52 प्रश्नांची उत्तरे दिली

965

एकीकडे विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असताना विदर्भातील कोटय़वधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अधिकार्‍यांनी पवार यांना 57 प्रश्न विचारून त्यावर लेखी उत्तर मागितले होते. पवार यांनी 16 सप्टेंबर 2019 रोजी त्यापैकी केवळ 52 प्रश्नांची उत्तरे सादर केली आहेत. उर्वरित पाच प्रश्नांच्या उत्तरासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली आहे. संबंधित माहिती मिळाल्यानंतर ते उर्वरित प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचे राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर चौकशी पथकाने पुढे वाटचाल करताना पवार यांना प्रश्नावली दिली होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस ऍण्ड इन्स्ट्रक्शनमधील नियम 10 अनुसार संबंधित मंत्री त्यांच्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात. पवार हे जल संसाधन मंत्री असताना विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गतच्या विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. यासंदर्भात जनमंच या सामाजिक संस्थेची एक व कंत्राटदार अतुल जगताप यांच्या चार जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. विदर्भातील सिंचन प्रकल्पांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती करणारी जनहित याचिका जनमंच आणि अतुल जगताप यांनी हायकोर्टात  सादर केली. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर आता अंतिम सुनावणी सुरू होत आहे.

 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी

सिंचन घोटाळय़ाच्या दोन्ही याचिकांवर 20 नोव्हेंबरपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकार व एसीबीला आवश्यक असणारी माहिती रेकॉर्डवर सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. अजित पवार यांनी नियमबाह्यरीत्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात सुमारे 182.9630 कोटी आणि  जीगावच्या कंत्राटदाराला 12.11 कोटींचा मोबलायझेशन ऍडव्हान्स मंजूर केल्याची माहिती महासंचालक संजय बर्वे यांनी कोर्टाला दिली होती. त्याअनुषंगाने 16 जुलै 2019 रोजी अजित पवार यांची अतिरिक्त अधीक्षकांनी चौकशी केली.

आपली प्रतिक्रिया द्या