उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोडले साखर कारखाने समितीचे अध्यक्षपद

सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून हमी देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडले होते. त्यापाठोपाठ आता आजारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले आहे. यापुढे या समितीचे अध्यक्ष सहकारमंत्री असणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अवसायानात काढलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीत जुलै 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष सहकारमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री असतील अशी सुधारणा करण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 2020 रोजी या समितीमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. ही समिती पुन्हा पाच जणांचीच करण्यात आली असून उपमुख्यमंत्र्यांना त्यातून वगळण्यात आले आहे. सहकारमंत्री समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या