वरळी, दादरमधील विकासाची अजित पवार यांनाही भुरळ! आदित्य ठाकरे यांच्यासोबत केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळी, दादर-माहीम विभागात पुलांखाली  तयार करण्यात आलेली आकर्षक उद्याने, व्हर्टिकल गार्डन, सुशोभित वाहतूक बेटे, ह्युइंग गॅलरी अशा विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ही सर्व विकासकामे पाहिली. ही कामे आकर्षक असून इतर ठिकाणी अशीच कामे करण्यासाठी नक्कीच आदर्श ठरतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून अनेक नवे उपक्रम राबवण्यात येत आहेत. हे प्रकल्प पालिका, ‘सीएसआर’ फंड आणि राज्य सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत आहेत. या कामांच्या आकर्षणामुळेच आपण इथे आल्याचे अजित पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले. ही सर्व कामे अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आल्याचे ते म्हणाले. या ठिकाणी राबवलेल्या उपक्रमांमधून आपल्यालाही बरेच काही शिकता येईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. मुंबईला मिळणारा निधी वाढवण्याची गरज असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या ठिकाणी येणाऱया नागरिकांशी आपण संवाद साधला असता त्यांनी सर्व प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले.

अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत लव्ह ग्रो पंपिंग स्टेशन, जांबोरी मैदान (महात्मा गांधी मैदान), सेनापती बापट मार्गावरील ब्रीजखाली करण्यात आलेले सौंदर्यीकरण, धोबीघाट ह्युइंग गॅलरी,  सातरस्ता चौक सौंदर्यीकरण, रेसकोर्स सौंदर्यीकरण-सायकल ट्रक, पोचकन वाला रोड, हिलटॉप लेन सौंदर्यीकरण पाहिले. यानंतर त्यांनी दादर चौपाटी – माता रमाबाई आंबेडकर स्मृती ह्युविंग गॅलरी,  माहीम बीच सौंदर्यीकरणाची पाहणी केली. या वेळी आमदार सदा सरवणकर, शिवसेना उपनेते सचिन अहिर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, नगरसेवक मिलिंद वैद्य, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार, सहाय्यक आयुक्त शरद उघडे, किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी केले सारथ्य!

उपमुख्यमंत्री अजित पवार अगदी सकाळी 6.45 वाजताच वरळी लव्ह-ग्रो पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर त्यांनी जी/दक्षिण विभागातील अनेक कामे पाहिली. या दौऱयात आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. त्याच गाडीतून अजित पवार यांनी प्रवास केला. या वेळी पालिकेतही शिवसेनेसोबत युती करणार का असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता याबाबत वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

निसर्गाचा समतोल साधला हे विशेष

विकासकामे-सौंदर्यीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, झाडे वाचवली पाहिजेत अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असते. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून झालेली विकासकामे करताना पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचली नसल्याने कामे वैशिष्टय़पूर्ण झाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या वेळी काढले.