
राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अजित पवार यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री व्हावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा पूर्ण होवो, असं विधान नाना पटोले यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी पटोलेंना शुभेच्छा दिल्या. नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे नेते काम करत असतात, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. प्रत्येकाचं काही ना काही उद्दीष्टं असतं. त्या अनुषंगाने प्रत्येकजण काम करत असतो. कुणाला आमदार, खासदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न असतं. तर काहींचं राष्ट्रीय नेते होण्याचं स्वप्न असतं. त्यामुळे त्यांना तसे वाटणे स्वभाविक आहे. त्यासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे अजित पवार म्हणाले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारताच अजित पवार संतापले. ते आपल्या खास शैलीत म्हणाले, अरे कितीदा, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? 50 वेळा तेच-तेच चाललंय.याचे आपण अनेकदा उत्तर दिले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.



























































