विनामास्कवाल्यांसमोर आता डोके फोडू का? अजित पवार संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका, आपण अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे. पण अजूनही अनेक पठ्ठे विनामास्कचेच आले आहेत. आता त्यांच्या पुढे डोके फोडून घ्यायचे का अशा शब्दांत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरमधील कार्यक्रमात मास्कशिवाय फिरणाऱयांची खरडपट्टी काढली.

अजित पवार हे नगर जिह्याच्या दौऱयावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक जण मास्क न घालता आले होते. त्यांनी ही बाब हेरली आणि व्यासपीठावरून भाषण करताना अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत विनामास्क फिरणाऱयांचा समाचार घेतला. जाहीर कार्यक्रमात विनामास्क फिरणाऱयांकडे बोट दाखवत, हे बघा हे पठ्ठे विनामास्कचे फिरत आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्राकडून 25 हजार कोटींची थकबाकी
लॉकडाऊन आणि आर्थिक विकास दर यावर भाष्य करताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. कोरोना काळात सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. त्यातच केंद्र सरकारकडून राज्याच्या वाटय़ाचे 25 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. पण तरीही राज्य सरकारने उपलब्ध पैशात कामे सुरुच ठेवली आहेत असे ते म्हणाले.