
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठवल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले. दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची बाळासाहेब थोरातांसोबत फोनवर काही चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
पत्रकारांनी अजित पवार यांना या राजीनाम्याविषयी विचारले असता ते म्हणाले. ”बाळासाहेबांच्या राजीनाम्याविषयी मला माध्यमांमधून समजले. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मी त्यांना प्रसारमाध्यमांवर सुरू असलेल्या बातम्यांविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले. दादा दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन” अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे.
काँग्रेसमध्ये गडबड गोंधळ, प्रदेश अध्यक्षांना हटविण्याची मागणी
नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसमध्ये पुन्हा गडबड गोंधळ सुरू झाला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील घोळाबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताच नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी तर भाजपमधून आलेल्या पटोले यांना चार वर्षात आठ पदे कशासाठी? असा प्रश्न करत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.
घरातला प्रश्न घरातच सोडवू – नाना पटोले
बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी काय पत्र लिहिलंय हे मला माहिती नाही. नाशिक पदवीधर मतदार संघातील या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी 13 फेब्रुवारीला बैठक बोलाकण्यात आली आहे. हा आमच्या घरातला प्रश्न हा घरात सोडवू. थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहिलं नसेल, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.