आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का? अजित पवारांच्या संतप्त सवालाने सत्ताधारी चिडीचूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात नेहमीच आक्रमकपणे भाषण करीत असतात. आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना निधीच्या मुद्दय़ावरून भाजपवर हल्ला करीत होते. तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यावर अजित पवार प्रचंड संतापले आणि अरे बाबा थांब ना जरा तुलाच फार कळतंय का आम्ही इथे गोटय़ा खेळायला आलोय का, असा संतप्त सवाल केला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या बाकावरील सदस्य एकदम चिडीचूप झाले.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधीच्या मुद्दय़ावरून उद्देशून बोलत होते. महाविकास आघाडीतील आमदारांना आम्ही पाच कोटी रुपयांचा निधी दिला; पण तुमच्याही आमदारांना दोन कोटी रुपयांचा निधी दिला, असे सांगितले. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी बाकावर बसूनच आरडाओरडा व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱया सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडे बघत, तुम्हाला काही बोलायचे असेल तर उभे राहून बोला, बाकावर बसून बोलू नका, अशा शब्दांत सुनावले. पण तरीही सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालत होते. त्यावर आम्ही इथे गोटय़ा खेळायला आलो नाही, अशा शब्दांत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरच्या सदस्यांना सुनावले.

एकनाथ राहा, ‘ऐक’नाथ होऊ नका

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. तेव्हा निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय काय घेतला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं एकनाथ राहावं ऐकनाथ होऊ नये, ऐकनाथ होण्यामुळे स्वतŠच घेतलेले निर्णय स्वतŠलाच बदलावे लागतात, असा टोला राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी लगावला.

रिक्षावाला मुख्यमंत्री झाले म्हणून नगरसेवक खुश होते. परंतु, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून येईल, असा निर्णय घेतला. त्यामुळं नगरसेवकांत शिंदे यांच्याबदद्ल नाराजी आहे. या राज्यात जनतेतून मुख्यमंत्री निवडायचा आहे. सर्वांचा हातात बॅलेट दिलं तर मुख्यमंत्री कोण होईल, असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे म्हणाले, डॉ. कुटे यांनी भाषण केलं. सत्तांतराची परिस्थिती होती तेव्हा तेव्हा कुटे सुरतेला गेले. सुरतेहून गुवाहाटीला गेले. तिथून गोव्याला आले. गोव्याहून महाराष्ट्रात आले. पण, त्यांच्या वाटय़ाला काही आलं नाही. त्यांच्या मनातील खंत मी ओळखत असल्याचे म्हणून कुटे यांनाही मुंडे यांनी डिवचलं.

मुंडेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा दम

विरोधात बोलले की त्याची बोलती बंद करायची ही भाजपची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज अंगिकारली. धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षरीत्या करुणा शर्मा प्रकरणाची आठवण करून दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, धनंजय मुंडे तिकडे किती ओरडत होते. ते एवढय़ा जोरात ओरडत होते की जसे मूळचे शिवसैनिकच वाटत होते. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळे हे झालं. पण ती परत परत दाखवता येणार नाही.

आणि करुणा शर्मा विधिमंडळात..

एकनाथ शिंदे यांनी करुणा शब्द सभागृहात उच्चारल्यानंतर काही वेळातच धनंजय मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त ठरलेल्या करुणा शर्मा विधिमंडळात दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या. तिथल्या अॅण्टी चेंबरमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. त्यामुळे हा निक्वळ योगायोग नाही अशीच चर्चा विधानभवनात रंगली.