भाजपच्या पापांची जबाबदारी आरएसएस घेणार का?

>> अजित विष्णू रानडे (FCA)

भारतीय जनता पक्षाचे राजकारण आणि सत्ताकारण यांच्याशी आपला संबंध नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नेहमीच सांगितले जाते; परंतु रा. स्व. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे आणि संघाशिवाय भाजपचे पान हलत नाही हेही सर्वश्रुत आहे. तेव्हा प्रश्न इतकाच आहे की, भाजप आज स्वार्थी राजकारणासाठी जे ‘पापकर्म’ करीत आहे त्याची जबाबदारी रा. स्व. संघ घेणार का, असा प्रश्न लेखकाने त्यांच्या लेखात उपस्थित केला आहे…

‘संपूर्ण जगाला पथदर्शक असा भारत आम्हाला उभा करायचा आहे. संपन्नता जिथे चांगल्या नीतीमुळे प्राप्त होईल, परोपकार जिथे अजेय सामर्थ्याचे अंग असेल. समृद्ध जीवनाची आकांक्षा पूर्ण करणारी शासन, प्रशासनाची नीती स्पष्ट होते आहे. समाजात आदर्श व्यक्तींच्या सुयोग्य आचरणाची उदाहरणे व सुसंस्कारांच्या निर्मितीची आवश्यकता आहे. समाजात वातावरण निर्मितीमुळे आचरणात बदल होतात. त्याच आधारे व्यवस्था परिवर्तन शक्य होत असते. या महान देशाच्या नवनिर्मितीमध्ये सहयोग देण्याचे आवाहन करतो’, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. मात्र पुढील काळात रा. स्व. संघाची राज्यातील एकूण राजकारणातील भूमिका या म्हणण्याला पुष्टी देणारी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आपण टप्प्याटप्प्याने बघूया.

उदाहरण क्र. 1) विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 पर्यंत एकनाथ खडसे यांचा हात धरून किल्ला लढवणारे भाजपचे नेते होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्याच्या भाजप श्रेष्ठाRनी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या धुरिणांना मार्गदर्शक मंडळात पाठवून बाजूला केले. तोच ‘आदर्श’ डोळ्यांपुढे ठेवून फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना पुढे पक्षात एकटे पाडले. 25 वर्षांची शिवसेनेची युती तोडली. त्या वेळेस शिवसेना व काँग्रेस यांचा घरोबादेखील नव्हता ही गोष्ट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बांडगूळ पंपनीने विचारात घ्यावी. केवळ सत्तेच्या हव्यासापायी भाजपने शिवसेनेबरोबरची युती 2014 मध्ये तोडली, परंतु जनतेला हे रुचले का, तर नाही!

राजकीय स्वार्थासाठी मैत्री तोडणाऱ्या (त्यांचे दुहेरी सभासदत्व असूनदेखील) भाजपला जनतेने पूर्ण बहुमत देण्यास नकार दिला व 120 आमदारांवरच थांबवले. जनतेला एकटा भाजप नको होता. हा पराभव भाजप, यमक जुळले म्हणून टाळ्या वाजवणाऱ्या पक्षाध्यक्षांना व रा. स्व. संघाला चांगलाच झोंबला. त्यांनी गुप्तपणे एक योजना तयार केली. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला ‘गाजर’ दाखवले. झाले! आकडे सोबत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. भाजपने वातावरण निर्मिती केली व रा. स्व. संघाने त्यास पाठिंबा दिला. त्यातून आपल्या स्वच्छ आचरणात बदल झाला हे सरसंघचालकांनी दाखवून दिले. सरसंघचालकांनी त्यांच्याच एका स्वयंसेवकाला विधानसभेचे सभापती म्हणून नेमण्याचा आग्रह धरला व गुप्त योजनेची कारवाई सुरू झाली.
शिवसेनेने आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळावे असा प्रस्ताव पुढे केला, पण तो पुढे आला नाही. कारण जर शिवसेनेला आधी ते पद दिले तर गुप्त योजनाच बारगळणार होती. राष्ट्रवादी व काँग्रेस तर पूर्ण विरुद्ध होते. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपला 145 आकडा गाठणे अशक्य होते. त्या वेळेस ‘नागपूर’हून नेमणूक केलेले हरिभाऊ बागडे प्रकाशात आले. त्यांनी आल्या आल्याच लंबकर्ण दाखवले. मतदानाच्या वेळी त्यांनी आवाजी पद्धतीचा वापर करून 120 आमदारांचे बोलणे हे 145 आमदारांचे बोलणे आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव पास झाला असे घोषित केले. भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांनी पाप-पुण्याच्या सीमा कधीच पार केल्या आहेत, पण रा. स्व. संघाकडून या कर्माची अपेक्षा नव्हती. बहुमत नसताना एखाद्या व्यक्तीस ठराव खोटेपणाने पास करायला लावून राज्याचा मुख्यमंत्री ठरवणे हे पाप आहे व ही सर्व जबाबदारी संघाचीही आहे. या प्रकारे तुम्ही महान देशाची नवनिर्मिती करणार आहात का?

आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांचे विचार व त्यांचा आदर्श याकडे दुर्लक्ष करून संघाला परिवर्तन हवे आहे का? आज फडणवीस कोणालाही घेऊन सरसंघचालकांकडे येतात व त्यांना शाल श्रीफळ देऊन आपलेसे करतात. याप्रकारे घरी येऊन शाल, श्रीफळ देणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अप्रतिष्ठा आहे. हे वर्तन संघविचारास धरून नाही. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी प्रसिद्धीला सदैव वर्ज्य मानले हे कोणी विसरू नये!

उदाहरण क्र. 2) सन 2017 ः 40 आमदारांचे एक राज्य गोवा. तेथे विधानसभा निवडणूक झाली. निर्णायक बहुमत कोणालाही नव्हते. सर्वात मोठा विजेता पक्ष होता काँग्रेस. पण तेथेही भाजपने घाणेरडे राजकारण केले.

महाराष्ट्र गोमंतक पक्षातील तीन आमदारांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाचारण केले व काही अटींवर पाठिंबा देण्याचे मान्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी पह्न लावून नितीन गडकरी यांना दिल्लीवरून गोव्यास बोलाविले. त्या गोव्यातील तीन आमदारांचा प्रस्ताव असा होता की, मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा असेल. नितीन गडकरी पुन्हा त्याच रात्री दिल्लीस रवाना झाले व त्यांनी थेट मनोहर पर्रीकर यांचे घर गाठले व हा प्रस्ताव मांडला. मनोहर पर्रीकर संघाचे सच्चे स्वयंसेवक. म्हणून त्यांनी विलंब न लावता होकार दिला. मनोहर पर्रीकरांइतका सच्चा स्वयंसेवक आजसुद्धा संघात नाही. पुढे मनोहर पर्रीकरांचे काय झाले हे सर्व जगाला ठाऊक आहे. भाजपने मनोहर पर्रीकरांचा राजकीय बळी दिला.

राजकीय महत्त्वाकांक्षा जरूर असावी, पण देशाचा बळी देऊन? इतके खालच्या पातळीवर जाऊन? देशाला संरक्षणमंत्री नसला तरी चालेल, पण 40 आमदारांचे गोवा आपल्याला मिळायला हवे, इतकी क्षुद्रबुद्धी फक्त भाजपचे नेतेच दाखवू शकतात. अमित शहा संघाचे स्वयंसेवक बहुधा नसावेत, पण नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस तर आहेत ना? तर मग सरसंघचालक मोहन भागवतांना माझा असा प्रश्न आहे की, दुष्कर्माची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?
गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या शेवटच्या भाषणात behavioral norms of swyamsevaks, their attitudes या गोष्टी सुधारण्यावर भर दिला होता तसेच `Determined to integrate’ Hence, whatever the situation, We have deceided never to allow prejudices and mutual ill-will to harm the sangatan असे शेवटचे वचन दिले होते, पण तुम्ही तर भाजप नेत्यांना (दुहेरी सदस्यत्व देऊन) पाप करायला प्रोत्साहन देत आहात. पर्यायाने तुम्हीसुद्धा या पापाला तेवढेच जबाबदार आहात.

उदाहरण क्र. 3) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपसाठी निवडणुकांत काम करतो हे सर्वश्रुत आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांमध्ये संघाचे स्वयंसेवकांची संख्या जास्त होती हेदेखील सर्वश्रुत आहे. संघाच्या निष्कलंक चारित्र्याची ग्वाही टीकाकारसुद्धा देतात. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या समर्पित तपश्चर्येमुळे संघ देशात सर्वत्र दृढमूल झाला आहे, पण आज काय आहे? ही वेळ संघावर का यावी?

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या स्वयंसेवकांची घरे भरण्यासाठी तुम्ही हट्ट करून पैसे मागितलेत, ते तुमच्या लाडक्या देवेंद्र फडणवीस व बांडगूळ पंपनीने दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते इतके हावरे कसे झाले? त्यांना घाम गाळून पैसे मिळवता येत नाहीत का? पुन्हा फडणवीस सरकारने हे पैसे स्वतःच्या खिशातून दिले नाहीत, तर सरकारी तिजोरीतून दिले. सर्व जणांनी कर भरायचा आणि त्या पैशांवर तुम्ही ताव मारायचा हे योग्य नव्हे.

उदाहरण क्र. 4) सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला 105 जागांवर थांबवले. खरे तर ती अधोगतीच होती. शिवाय ‘‘मी पुन्हा येईन’’ अशी गर्जना केली खरी, पण ती फुसकी ठरली. या माणसाला एकट्यालाच कायम मुख्यमंत्री व्हायचे होते. शिवसेनेला दिलेले वचन मोडले गेले. आता पुढे काय झाले हे बांडगूळ पंपनीने ध्यानात ठेवावे. पहिली माती फडणवीसांनी खाल्ली. फडणवीसांनी त्या वेळेस राष्ट्रवादीचे पाय धरले. फडणवीसांनी जी अॅक्शन घेतली त्याची महाविकास आघाडी ही रिअॅक्शन होती. पहाटेच्या वेळी फडणवीस व अजितदादांचा शपथविधी झाला. त्या वेळेस सर्वप्रथम सकाळी 7.15 वाजता नितीन गडकरींनी अभिनंदन केले होते. गडकरीसुद्धा यात पहिल्यापासून सामील होते. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हा प्रस्ताव बहुमताने पास करण्यासाठी पुन्हा तोच म्हणजे 2014 चा डाव टाकण्याचे ठरवले, पण सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव ‘इन पॅमेरा’ पास करा असे सांगितले आणि फडणवीसांवर 80 व्या तासाला राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. भाजपच्या पापांची ही काही उदाहरणे आहेत. त्या पापांची जबाबदारी रा. स्व. संघ घेणार आहे का?
(या लेखातील मते लेखकाची आहेत, त्याच्याशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)