सौदा स्वस्तात होता, मग ‘राफेल’ची 126 विमाने का खरेदी केली नाहीत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राफेल जेट फायटर विमानांचा केलेला सौदा स्वस्तातला होता, तर 126 ऐवजी 36 विमानेच का खरेदी केली, असा सवाल करत ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी संरक्षणमंत्री ए. के. अँण्टोनी यांनी आज मोदी सरकारवर भेदक हल्ला चढवला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राफेलचा खरेदी करार यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात जवळपास पूर्ण झाला होता, असे सांगून ते म्हणाले की, एनडीएचे सरकार 2014 सालात केंद्रात सत्तेवर आले. त्या सरकारने 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय 10 एप्रिल 2015 रोजी एकतर्फीपणे घेतला. हवाई दलाने 126 विमाने मागितलेली असताना  विमानांची संख्या 36 पर्यंत का घटवली, याचे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी द्यावे, अशी मागणी अँण्टोनी यांनी केली.

‘एचएएल’ विमान कंपनी यूपीए सरकारच्या काळात नफा कमावणारी कंपनी होती. मोदी सरकारच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच त्या कंपनीने विविध बँकांकडून 1 हजार कोटींचे कर्ज  घेतले आहे, असा गौप्यस्फोटही अँण्टोनी यांनी केला. भाजप सरकारचे संरक्षणमंत्री सांगतात की, ‘एचएएल’ कंपनी लढाऊ विमानांची निर्मिती करण्यास सक्षम नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, अशी निर्मिती करणारी ‘एचएएल’ ही एकमेव एअरोस्पेस कंपनी आहे, असेही अँण्टोनी म्हणाले.

राफेल विमान खरेदीचा सौदा 9 टक्क्यांनी स्वस्त आहे, असे मोदी सरकारमधील कायदामंत्री सांगतात. अर्थमंत्री म्हणतात की, ते ‘डील’ 20 टक्क्यांनी स्वस्त आहे. हवाई दलाचे अधिकारी तो सौदा 40 टक्क्यांनी स्वस्त आहे असे म्हणत आहेत. ते खरे असेल तर 126 विमानांची खरेदी का केली नाही, ते आधी सांगा! ए. के. अँण्टोनी, माजी संरक्षणमंत्री

देशाच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर तडजोड केली

यूपीए सरकारने केलेला राफेलचा करार रद्दबातल केला गेला नसता तर आपल्या हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड (एचएएल)ला अत्याधुनिक तंत्र मिळण्याची संधी प्राप्त झाली असती. मोदी सरकारने ती संधी गमावली असून राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर तडजोड करण्यात आली आहे, असा स्पष्ट आरोप माजी संरक्षणमंत्र्यांनी केला.

‘राफेल’ करारातून ‘एचएएल’ यूपीएच्या काळातच बाद झाली होती!

राफेल करारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) या कंपनीला ‘यूपीए’ सरकारनेच बाहेर काढले होते, असे सांगत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज काँग्रेसचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँन्टोनी यांच्यावर पलटवार केला. राफेल कराराच्या मद्दय़ावर ‘एचएएल’ला वगळून ‘रिलायन्स’ला कंत्राट दिल्याबद्दल भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान सुरू आहे. राफेल जेट खरेदीचा करार यूपीए सरकारच्या काळात झालाच नव्हता, असे सांगून संरक्षण मंत्री सीतारामन म्हणाल्या की, त्यांच्या काळात एचएएल आणि डसॉल्ट यांच्यात उत्पादनाच्या अटी-शर्थींवर एकमत झालेच नव्हते. त्यामुळे ‘एचएएल’ त्या करारातून बाहेर फेकली गेली. हे सारे यूपीएच्या काळात घडले आहे.

9100 कोटींच्या शस्त्रखरेदीला मंजुरी

राफेल खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद पेटलेला असताना संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानी लष्करासाठी 9,100 कोटी रुपये किमतीची लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यात आकाश मिसाईल प्रणालीच्या दोन रेजिमेंटचाही समावेश आहे असे संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स ऑक्विसिशन काऊन्सिलने स्पष्ट केले.