अक्कलकोटमध्ये पूर्ववैमनस्यातून खून; 4 जखमी, सहाजणांना अटक

पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला असून, सोडविण्यास आलेले चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद येथे घडली आहे. याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

विश्वनाथ बसण्णा पाटील असे मृताचे नाव असून, सिद्धराम हणमंत पाटील, रामचंद्र हणमंत बिराजदार, अजय बिराजदार व संजय बिराजदार अशी जखमींची नावे आहेत. तर, चंद्रकांत मसण्णा गायकवाड, धोंडिबा मसण्णा गायकवाड, मसण्णा धोंडिबा गायकवाड, अंबादास शंकर कोळी, लिंगप्पा शंकर कोळी, सूर्यकांत शंकर कोळी, बलभीम शंकर कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विश्वनाथ पाटील याचा गावातीलच गायकवाड व कोळी कुटुंबांसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. गावातील दुकानदार रामचंद्र बिराजदार व उपसरपंच कोळी यांच्यात धान्य वाटपावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. दुपारी विश्वनाथ पाटील व वरील आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून आरोपींनी विश्वनाथ पाटीलवर कुऱहाड व तलवारीने वार केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेले सिद्धराम पाटील, रामचंद्र बिराजदार, अजय बिराजदार व संजय बिराजदार यांच्यावरही हल्ला करण्यात आला. यात ते सर्व जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, या तीन कुटुंबांतील वादामुळे ममनाबाद गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या