काटेपूर्णा

अनंत सोनवणे,sonawane.anant@gmail.com

विदर्भातील काटेपूर्णा अभयारण्य… नितांत सुंदर… हिरवंगार…

तसं तर प्रत्येक जंगल सुंदर असतं. प्रत्येकाचं स्वतःचं असं वैशिष्टय़ असतं. तरीही काही जंगलांना निसर्गाने थोडं अधिक सौंदर्य बहाल केलेलं असतं. निसर्गसौंदर्यानं अत्यंत समृद्ध असलेलं असंच एक सुंदर जंगल म्हणजे काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य. इथल्या विस्तीर्ण जलाशयाच्या मंद लहरींवर हिंदकळणारं मावळतीच्या सूर्याचं प्रतिबिंब एकदा पाहिलं की आयुष्यभर ते निसर्गचित्र विसरता येणार नाही. या सर्वांगसुंदर निसर्ग दृश्याला पार्श्वसंगीत लाभतं ते हजारो पक्ष्यांच्या किलबिलाटाचं. निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी जणू अभूतपूर्व पर्वणीच.

८ फेब्रुवारी १९८८ रोजी या जंगलाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आणि काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य अस्तित्वात आलं. अकोला जिह्यात काटेपूर्णा नदीच्या काठावर हे अभयारण्य वसलंय. अभयारण्याचा बराचसा भूभाग काटेपूर्णा जलाशयाच्या पाण्याने व्यापलेला आहे. हा जलाशय खूप विस्तीर्ण आहे. जलाशच्या भोवतालचं जंगल सदैव हिरवंगार असतं. मात्र जंगलाचा अंतर्गत भाग तुलनेत शुष्क दिसतो. तिथला भूभाग विरळ जंगल, माळरान, गवती रान, डोंगराळ स्वरूपाचा आहे.

bird-1

काटेपूर्णा अभयारण्य आपलं निसर्गविषयक ज्ञान अधिक समृद्ध करतं. अभयारण्याच्या प्रवेशद्वारा- पाशीच निसर्ग परिचय केंद्र आहे. या केंद्रात अभयारण्यातले प्राणी, पक्षी, वृक्ष, वनस्पती यांची ओळख करून देणारी चित्रं आहेत. पर्यटकांना निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता यावा यासाठी दोन किलोमीटरची पायवाट बनवण्यात आली आहे. पक्षी निरीक्षणासाठी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसंच जंगल सफारीसाठी साधारणतः २० कि.मी. लांबीचा ट्रक तयार करण्यात आला आहे. कासमार, चाका लपणगृह, रिव्हर ह्यू, चिंचबन फेट्रा, पांडव लेणी, रिव्हर पॉइंट, चौफुला या साऱया परिसरातून हा जंगल सफारीचा ट्रक गेला आहे. आपल्या खासगी वाहनाने जंगल सफारीचा आनंद घेता येतो. वन्यप्राणी पाहायचे असल्यास एप्रिल ते जून या काळात काटेपूर्णा अभयारण्याला भेट द्यावी. इथं बिबटय़ाचा अधिवास आहे. तसंच लांडगा, काळवीट, पट्टेरी तरस, रानमांजर, नीलगाय, काकर, चौशिंगा, रानडुक्कर, ससे, खवले मांजर, उदमांजर, मुंगूस इत्यादी प्राणीही इथं पाहायला मिळतात.

bird-2

काटेपूर्णा अभयारण्य पक्षीप्रेमींच्या विशेष आवडीचं आहे. कारण इथल्या जलाशयाच्या परिसरात विविध प्रजातींचे पक्षी मोठय़ा प्रमाणावर सहज दिसू शकतात. विशेषतः हिवाळय़ात इथे अनेक स्थलांतरित पाणपक्षी पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षकांसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. इथं १५० हून अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यात स्वर्गीय नर्तक, नवरंग, बोनेलीचे गरुड, बुटेड गरुड, सापमार गरुड, तिसा, शिका, श्येन, शृंगी घुबड, पिंगळा, नीलपंख, काळा व करडा कोतवाल, टकाचोर, भारद्वाज, चंडोल, रानकोंबडा, पीतमुखी व लालमुखी टिटवी, पोपट, खाटीक, भटतित्तर, लावे, राखी तित्तर, मोर, वटवटे, मराल बदक, अडई, कळा करकोच, उघडचोच बलाक, शिंपी, पाणथळ पिपिट, दलदल तुतवार, पेंटेड स्नाईप इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेनं अतिशय समृद्ध असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांसाठी सोयी-सुविधा मात्र म्हणाव्यात तितक्या विकसित झालेल्या नाहीत. अभयारण्याच्या आसपासच्या गावांमधल्या तरुणांना याकडे रोजगाराची संधी म्हणून पाहता येईल.

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…स्थलांतरित पाणपक्षी

जिल्हा…अकोला

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…७३.६९० चौ.कि.मी.

निर्मिती…१९८८

जवळचे रेल्वे स्थानक…अकोला (४० कि.मी.)

जवळचा विमानतळ…नागपूर (२९२ कि.मी.)

निवास व्यवस्था…अकोला इथे खासगी हॉटेल्स.

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते फेब्रुवारी व एप्रिल ते जून

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही