
अकोले तालुक्यातील दुर्गम भागात चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या शेतकऱयांच्या शेतावर छापा घालून राजूर पोलिसांनी सुमारे 270 किलो गांजाची हिरवी झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे.
मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगरदरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकऱयांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने गांजाच्या शेतीचा छडा लावला.
घटनास्थळी वाहनाने जाणे शक्य नसल्याने पोलिसांच्या पथकाने सुमारे 3 किलोमीटर डोंगरदरीत पायी जात कारवाई सुरू केली. यावेळी या शेतात इतर पिकाबरोबर गांजाची झाडे आढळून आली. गुरुवारी उशीर झाल्याने व अंधार पडल्याने या पथकाने 4 किलो 600 ग्रॅम झाडे तोडून ताब्यात घेतली. शुक्रवारी सकाळी या पथकाने पुन्हा घटनास्थळी जाऊन उर्वरित कारवाई केली. या कारवाईत एकूण तब्बल 270 किलो हिरवीगार गांजाची झाडे (2 लाख 70 हजार रुपये किंमत) ताब्यात घेतली. तसेच, वरील चारजणांना अटक करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलीस निरीक्षक खैरनार, पोलीस नाईक दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, साईनाथ वर्पे, ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



























































