
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या बहुचर्चित ‘जॉली एलएलबी-3‘ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये वकिली व्यवसायाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि न्याय व्यवस्थेचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पुण्याच्या सिव्हिल कोर्टाने अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स बजावले असून 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पुण्यातील वकील वाजद खान, भारत बिडकर आणि गणेश म्हास्के यांनी ‘जॉली एलएलबी-3‘ चित्रपटविरुद्ध याचिका दाखल केली आहे. वकिली व्यवसायाचे अपमानास्पद चित्रण आणि न्याय व्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
‘जॉली एलएलबी-3‘ चित्रपटामध्ये एका दृश्यात न्यायाधीशांसाठी ‘मामू‘ हा शब्द वापरण्यात आला असून त्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. या याचिकेचा विचार करत न्यायालयाने अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स पाठवून आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ‘जॉली एलएलबी-3‘ हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आलोक जैन आणि अजित अंधेरे हे निर्माते आहेत. अक्षय कुमार, अर्शद वारसी हे प्रमुख भूमिकेत असून सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, अन्नू कपूर, बोमन इराणी यांनीही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 2013 मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ आणि 2017 मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी-2’ चा सिक्वेल आहे.