ऐकावे जनांचे… – अनुभवांचा अथांग आशावाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय मोटेगावकर

आपल्या ज्ञानाचा, कार्याचा उपयोग हा समाजहितासाठीच झाला पाहिजे असा खोलवर रुजलेला विचार सोबत घेत पत्रकार रिचा अनिरुद्ध यांनी सुरू केलेले यू टय़ूब चॅनेल ‘जिंदगी विथ रिचा’ हे त्यांच्या समानुभूतीच्या दृष्टिकोनाची साक्ष देणारे आहे.
इंग्रजी भाषेतील दोन शब्द मला फार भावतात – सिम्पथी आणि एम्पथी… सहानुभूती आणि समानुभूती. कोरोनाच्या काळातच ‘ऐकावे जनांचे’ या विचाराचे महत्त्व मला प्रकर्षाने जाणवले आणि त्याच काळात एक फार छान पॉडकास्ट मला गवसला तो म्हणजे रिचा अनिरुद्ध यांचा ‘जिंदगी विथ रिचा.’ रिचा अनिरुद्ध थत्ते या फक्त त्यांच्या रिचा अनिरुद्ध या नावानेच जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘जिंदगी लाईव्ह’ नावाचा शो आधी टेलिव्हिजनवर येत असे. त्याचेच पुढे रिचा अनिरुद्ध यांनी ‘जिंदगी विथ रिचा’च्या रूपात स्वतच्या यूटय़ूब चॅनेलसाठी विविध मुलाखतींच्या स्वरूपात रूपांतरण केले आणि ते अतिशय प्रसिद्ध झाले. हा पॉडकास्ट अतिशय प्रसिद्ध होण्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू होती ती म्हणजे रिचा अनिरुद्ध यांची समानुभूतीची भावना. सिम्पथी (सहानुभूती) मध्ये एखाद्याचे दुःख, सल ही फक्त समजली जाते, पण एम्पथी (समानुभूती) मध्ये ते दुःख, ती सल आपणच अनुभवतो अशा स्वरूपात समजून घेतली जाते. रिचा अनिरुद्ध यांचा अत्यंत संवेदनशील आणि समोरच्या व्यक्तीशी आपुलकीने, वात्सल्याने जोडून घेण्याचा स्वभाव त्यांच्या समानुभूतीच्या दृष्टिकोनाची साक्ष देतो.

रिचा यांचा जन्म मध्य प्रदेशमधील रेवा इथे झाला. शिक्षणानंतर त्या दूरदर्शनमध्ये रुजू झाल्या. पुढे राजस्थानमधील दैनिक ‘नवज्योती’ येथे पत्रकार म्हणून काम पाहिले. मग पुन्हा दूरदर्शन. काही काळ बिग एफ एम रेडिओमध्ये आणि नंतर झी न्यूजमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. झी न्यूजला असताना समाजातील फारशा प्रसिद्ध नसलेल्या, पण खऱया अर्थाने समाजहिताचे, समाजासाठी झटणाऱया व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे आणि त्यांच्या संघर्षाची कथा समाजासमोर आणण्याची शृंखला करण्याचे ठरले. या मुलाखती एक प्रसिद्ध अभिनेत्री घेणार होत्या, पण काही अडचणींमुळे त्यांना ते जमले नाही आणि मुलाखतीची निश्चित केलेली वेळ निघून जाऊ नये म्हणून रिचा अनिरुद्ध यांना ते काम सांगण्यात आले व त्यांनी ते फार सुरेखपणे निभावले. पुढे ती शृंखला ‘जिंदगी लाईव्ह.’ या कार्पामातून पुढे नेली. या कार्यक्रमाला व रिचा यांना अनेक पुरस्कार मिळाले. कार्पामाच्या वेगवेगळ्या सीरिज झाल्या होत्या. त्याच वेळी न्यूज चॅनेलमधील स्पर्धा वाढू लागली. या माध्यमाचे स्वरूप बदलले आणि यातून बाहेर पडत रिचा यांनी स्वतचे चॅनेल सुरु केले- ‘जिंदगी विथ रिचा’. याच नावाने त्यांनी मुलाखती घ्यायला सुरुवात केली. रिचा यांचा मूळचा पिंड चळवळीचा, कार्यकर्तीचा. आपल्या ज्ञानाचा, कार्याचा उपयोग हा समाज हितासाठीच झाला पाहिजे हा विचार इतका खोलवर रुजला होता. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या बहुतांश मुलाखती, त्यांच्या कार्पामातील पाहुणे बहुतकरून सामाजिक क्षेत्रात काम करणारेच होते.

त्यापैकी खूप साऱया मुलाखती या पुन: पुन्हा ऐकाव्यात अशा आहेत. रेड लाईट एरिआत काम करणाऱया सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली बब्बर यांची मुलाखत ऐकताना अंगावर काटा येतो. लहानपण अत्यंत हलाखीचे गेले असताना, अक्षरश कचऱयातून अन्न शोधून कधी कधी उदरनिर्वाह करावा लागलेल्या आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर एका नामांकित आणि तारांकित रेस्टॉरंटच्या हेड शेफ बनण्यापर्यंतचा लिलीमा खान यांचा रिचा अनिरुद्ध यांनी जागवलेला संघर्ष डोळ्यांत पाणी आणतो. पीपल अगेन्स्ट रेप इन इंडिया या संस्थेच्या प्रमुख योगिता भयाना यांनी रिचा अनिरुद्ध यांना सांगितलेल्या कथा आणि वेदना आपल्याला हादरवून सोडतात. अशा खूप साऱया कथा आणि वेदना आपल्यातले मनुष्यत्व ढवळून काढतात. आपल्या मनुष्यत्वाच्या व्याख्या पुन: पुन्हा तपासून पाहायला लावतात. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ऐहिक बाबतीत प्रगती होत असताना मानवी मूल्यांच्या बाबतीत मात्र अधोगती होत आहे की काय असा प्रश्न सतत पडत राहतो. अशा वातावरणात रिचा अनिरुद्ध यांनी घेतलेल्या या मुलाखती आपल्याला उत्तमोत्तम काम करण्यासाठी उत्तेजित करतात. ज्येष्ठ गायक पं. राजन मिश्रा, कॉमेडियन झाकीर खान, अभिनेता आशुतोष राणा, पंकज त्रिपाठी, कर्करोग योद्धे पांत वीज, कवी डॉ. कुमार विश्वास, मनोज मुंतशीर यांच्या मुलाखती प्रेरणादायी आहेत.

रिचा आपल्या ‘दिल से’ या पॉडकास्टमध्ये अनेक सेलिब्रिटीजबरोबर गप्पा मारतात त्यादेखील मनोरंजक आहेत. या मुलाखतींमधून रिचा कडू-गोड अनुभवांचा एक अथांग आशावाद श्रोत्यांना देतात.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
[email protected]