अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या पत्राला तीन कोटींची बोली

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एक हस्तलिखित पत्र सध्या जगात चर्चेचा विषय बनले आहे. कारण या पत्रात आईनस्टाईन यांनी लिहिलेले भौतिकशास्त्राचे जगविख्यात सूत्र आहे. त्यामुळेच अत्यंत दुर्मीळ अशा या पत्राचा लिलाव होत असून त्याला सुमारे तीन कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. येत्या 20 मेपर्यंत या पत्राचा लिलाव सुरू राहणार आहे.

आईनस्टाईन यांनी चार महत्त्वाचे सिद्धांत मांडले. E= mc2 हा त्यापैकीच एक सिद्धांत आहे. वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यात एक सूत्र त्यांनी बनवले होते. ते सूत्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले होते. तेच सूत्र आईनस्टाईन यांनी आपल्या हस्ताक्षरात 26 ऑक्टोबर 1946 रोजीच्या पत्रात लिहिलेले आहे. या पत्राचा लिलाव बोस्टन येथील आर.आर. ऑक्शन हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. आईनस्टाईनने हा जगप्रसिद्ध सिद्धांत केवळ चार पनांमध्ये लिहिलेला आहे.

त्यामुळेच या पत्राचे मूल्य अधिक आहे. हे आईनस्टाईन यांचे खाजगी पत्र आहे. ते प्रिन्स्टोन युनिव्हर्सिटीच्या लेटरहेडवर लिहिलेले आहे. जो कुणी लिलावात हे पत्र विकत घेईल त्याला टोकन (एनएफटी) आणि 5डी बायोमेट्रीक आर्ट पासपोर्ट दिले जाईल. जेणेकरून हे पत्र सत्य असल्याचे प्रमाणित होईल. तसेच मालकाला काळानुसार पत्राची देखभाल करण्याची अनुमती देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या