
जगातील धनाढय़ांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर असलेले, अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा हे मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनच्या नफेखोर आर्थिक संस्था व सरकारी बँकांवर तोफ डागून त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतला होता. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कट-कारस्थान असल्याचा संशय बळावला आहे.
व्यवसायातील मुस्कटदाबी रोखण्यासाठी यंत्रणा सुधारा, अशी मागणी जॅक मा यांनी केली होती. याचवेळी चीनच्या सरकारवर सडेतोड टीका करताना जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठांचा क्लब’ म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये शांघायच्या भाषणात केलेल्या या टीकेमुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी जॅक मा यांच्यावर चांगलीच भडकली होती. ते थेट राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या निशाण्यावर आले होते. तेव्हापासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नाहीत.
गेले दोन महिने त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्यामुळे गूढ वाढले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सच्या दाव्यानुसार, जॅक मा यांची एकूण संपत्ती 50.6 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. त्यांची मालकी असलेला अलिबाबा ग्रुप चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे.
राष्ट्राध्यक्षांवरील टीका महागात पडली
जॅक मा यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर टीका केल्यानंतर सरकारने त्यांच्या कंपन्यांवर कारवाईचा धडाका लावला. चीनी अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये एंट ग्रुपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओ निलंबित केला. तसेच अलिबाबा ग्रुपची चौकशी पूर्ण होईपर्यंत चीनमधून कुठेही बाहेर जायचे नाही, अशा सक्त सूचना दिल्या. याच महिन्यात ‘अफ्रिका के बिझनेस हिरोज’ या प्रसिद्ध शोच्या एपिसोडमधून जॅक यांचे नाव हटवण्यात आले.




























































