
जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राची झालेली दुर्दशा या समस्येने आरोग्य सेवा ग्रासलेली आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था रुग्णांना सेवा देण्यात कमी पडत असल्याने रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बोजवाऱ्याबाबत शिवसेनेने जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्याच्या कार्यलयात जाऊन जाब विचारला. जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे मात्र आरोग्य सेवा पुरविण्यात अपयशी ठरले असून आपले अपयश झाकण्यासाठी तुम्हीच डॉक्टर द्या असे अजब उत्तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेलाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हारुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या अंतर्गत आरोग्य सेवा पुरवली जाते. जिल्ह्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येत असतात. जिल्ह्यात आरोग्य सेवा सुरू असली तरी रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे. डॉक्टरांची काही ठिकाणी मनमानी सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कर्मचारी याची वाणवा असते. उपजिल्हा रुग्णालयाची दुर्दशा झाली असल्याने रुग्ण बरा होण्या ऐवजी अजून आजारी पडत आहेत. इमर्जन्सी रुग्णांना जिल्ह्यात उपचार मिळत नसल्याने मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत घेतलेले निष्णात डॉक्टर मानधन न दिल्याने संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर विना नाहक रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे. सहा महिन्यांच्या मुलाचा डॉक्टर न आल्याने जीव गेल्याची घटना ताजी आहे. भुलतज्ञ डॉक्टर नसल्याने प्रसूतीला आलेल्या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. नोगोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर नसल्याने दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टर नसल्याने शासकीय रुग्णालयातील अतिदक्ष रुग्णांना मुंबईकडे उपचारासाठी नेण्यास सांगितले जाते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची जिल्ह्याची जबाबदारी असताना ते आपली जबाबदारी सांभाळण्यात अपयशी झाले आहेत. याबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ यांनी डॉ अजित गवळी याची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सांगितले असता, तुम्हीच डॉक्टर द्या असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले. या उत्तराने सारेच निरुत्तर झाले.
जिल्हा सामान्य रुग्णालय हे सध्या समस्येने ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत आहे अथवा खाजगी रुग्णालय किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी याची भेट घेऊन जाब विचारला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा अशी तंबीही शिष्टमंडळाने दिली आहे.
























































