दिव गावातील जमीन घोटाळ्याची होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहा तालुक्यातील दिव गावातील 350 एकर शासकीय खाजण जमीन घोटाळ्याबाबत विशेष अधिकारी नेमून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्वहारा संघटनेच्या उल्का महाजन यांना दिले आहे. तसेच दिव ग्रामस्थांना संरक्षण देण्याच मान्य केले आहे. त्यामुळे शासकीय खाजण जमिनीतील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी व दलालांचे धाबे दणाणले आहेत.

रोहा तालुक्यातील दिव गावातील शासकीय खाजण जमीन रोहा तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, दलाल यांनी संगनमत करून 350 एकर जमीन गुंतवणूक दारांना 4 करोड 95 लाखाला विकून घोटाळा केला. यामध्ये शासकीय जमीन आधी खोतीची जमीन करून दिव गावातील शेतकऱ्यांना कुळ बनविले आणि त्यानंतर शेतकऱ्याची फसवणूक करून जमीन नावावर करतो असे सांगून परस्पर जमीन गुंतवणूक दाराला विकली. हा सर्व प्रकार दोन महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून करून घेतला.

शासकीय खाजण जमीन घोटाळ्याबाबत ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन याची भेट घेऊन सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर येथील जमिनीचे व्यवहार थांबले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत निवेदन दिले होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची 28 ऑगस्ट रोजी उल्का महाजन यांनी भेट घेतली. त्यावेळी या घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा तसेच दिव ग्रामस्थांवर दबाव आणला जात असून त्यांना संरक्षण देण्याबाबत सांगितले. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी या घोटाळ्याची चौकशी निःपक्षपाती करून यासाठी अधिकारी नेमण्यात येणार आहे. चौकशी करून त्वरित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. तर दिव गावातील ग्रामस्थांना संरक्षणही दिले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

शासकीय खाजण जमिन घोटाळ्यात अडकलेले अधिकारी यांच्यावर कारवाई होईल मात्र त्याचबरोबर दलाल व यामागील मुख्य सूत्रधार यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागणे गरजेचे आहे.