
सामना प्रतिनिधी। अलिबाग
महाड तालुक्याला गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. महाड बाजारपेठेत व परिसरात आठ ते दहा फुटापर्यत पाणी साचलेले आहे. अनेक घरात पाणी घुसल्याने सामानाचे, धान्याचे नुकसान झाले आहे. पुरामुळे तालुक्यातील वीज, मोबाईल नेटवर्क ठप्प झाले आहेत. तर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे.
महाड तालुक्यात पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. महाड मधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मंगळावरी पाण्याची पातळी 9.60 मीटर पर्यत म्हणजे तीन मीटरने वाढली होती. तर आज बुधवारी धोक्याची पातळी 7 मीटर पर्यत पोहचली आहे. त्यामुळे महाडला पुराचा धोका कायम आहे.
महाडमध्ये पूरस्थिती असल्याने तसेच भोर घाटही बंद असल्याने पुणे येथून येणारी भाजी वाहतूक बंद झाली आहे. शहरातील मासेबाजार असलेल्या सुकट गल्लीत पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. मात्र महाड शहरात पाच दिवसांपासून सर्वत्र पाणीच साचल्याने भाजीचेही वांदे झाले आहेत. तसेच साठवून ठेवलेला भाजीपालाही सडू लागला आहे.
































































